पुणे – “डीआरडीओ’ संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिच्याशी सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे देशाच्या विविध सुरक्षा विषयक प्रकल्पांची माहिती पुरविली आहे, असे दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात म्हटले आहे.
ब्राह्मोस, अग्नी, मिसाइल लॉंचर, एमबीडीए या क्षेपणास्त्रांसह रुस्तुम, सरफेस टू एअर मिसाइल, इंडियन निकुंज पराशर या प्रकल्पांची माहिती दासगुप्ता हिला पुरविली आहे. तसेच डॉ. कुरुलकर यांनी डीआरडीओच्या संशोधन आणि विकास विभागाच्या सुरक्षा नियमावली संदर्भातील “मयूरपंख’ प्रणालीचाही भंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. हनीट्रॅपद्वारे गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले डॉ. कुरुलकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. शत्रू राष्ट्राला संरक्षण क्षेत्राची माहिती मिळाल्यास देशाच्या सुरक्षा व सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो, असा ठपका कुरुलकरवर आहे.
डॉ. कुरुलकर यांनी अधिकाराचा गैरवापर करून राष्ट्रीय सुरक्षा नियमांचा भंग करून ही माहिती हस्तांतर केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एटीएसने न्यायालयास सांगितले. डॉ. कुरुलकर यांची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हॉइस लेअर चाचणी करण्याच्या सरकारी पक्षाच्या मागणीसंदर्भात सुनावणी झाली. बचाव पक्षाने चाचणीला विरोध करून न्यायालयात अर्ज सादर केला. त्यावर न्यायालयाने सरकारी पक्षाला म्हणणे सादर करण्याची सूचना केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी दि.21 जुलैला होणार आहे.
…म्हणून घेतला दुसरा मोबाइल
अधिकृत मोबाइल क्रमाकांवरून डीआरडीओची गोपनीय माहिती देणे शक्य नसल्याने डॉ. कुरुलकर यांनी दुसरा मोबाइल खरेदी केला. यामध्ये सर्व प्रकल्पांची माहिती पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन फाइलद्वारे घेतली. झारा हिने अग्नी, ब्राह्मोस यांची माहिती बिंगो चॅटडॉट नेट आणि क्लाऊड चॅटडॉट नेटवर अपलोड करण्यास सांगून त्याच्या चित्रफिती पाठविण्यास सांगितल्या, असेही तपासात समोर आले आहे.