बाळासाहेब विखे पाटील आणि गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न डॉ. विखे पूर्ण करणारः आ. कर्डिले

पाथर्डी: साकळाई पाणीयोजने बाबत मुख्यमंत्र्यांनी दाखविलेली सकारात्मकता ही या भागाच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण ठरणार असून हक्काच्या पाण्यासाठी स्व. बाळासाहेब विखे पाटील आणि स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी पाहिलेले स्वप्न डॉ. सुजय विखे पाटील पूर्ण करतील, असा विश्‍वास आ. शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्‍त केला.

तालुक्‍यातील मिरी येथे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत आ. कर्डिले बोलत होते. गेली अनेक वर्षे हा भाग पाण्यापासुन वंचित राहिला. साकळाई पाणी योजनेचे काम गेली अनेक वर्षे प्रलंबित राहिल्याने या भागातील शेतकरी पाण्याची वाट पाहत आहेत. पण खरा पाठपुरावा या पाणी योजनेसाठी झालेल्या आंदोलनानंतर सुरु झाला. डॉ.विखे पाटील यांनी व्यक्‍तीश: मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळेच या चारीच्या सर्व्हेक्षणाचे आदेश देण्यात आले. ही योजना युती सरकारच पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भविष्यात वांबोरी चारीच्या योजनाही चांगल्या पध्दतीने कार्यरत होण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

डॉ. विखे पाटील म्हणाले की, ही निवडणूक विचारांची आहे. पाण्याच्या प्रश्नाचा विचार घेवून आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. या जिरायती भागाला न्याय मिळवुन देण्यासाठी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले. यापूर्वी राज्यात युती सरकार सत्तेवर असताना स्व.गोपीनाथराव मुंडे यांनीही या भागाच्या पाणी प्रश्नाला न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न केला. आता पुन्हा एकदा युती सरकारच्या माध्यमातुनच या भागाचा पाणीप्रश्न सोडविण्याचे उदिष्टे आपण ठेवले आहे. वाळकी येथे मुख्यमंत्र्यांनी या साकळाई योजनेच्या कामासाठी दाखविलेली भूमिका ही जिरायती भागातील शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण ठरली असुन पंतप्रधानांनी देखील पाण्यासाठी स्वतंत्र जलमंत्रालय स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा लाभही आपण आपल्या भागाकरीता करुन घेणार असल्याचे सांगितले. यावेळी मोहनराव पालवे, अनिल कराळे, संभाजी वाघ, राजेंद्र म्हस्के, राजु कारखेले, विनोद चितळे, जनार्दन वांडेंकर, कारभारी गवळी, निता मिरपगार, मोहन कुटे आदि उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.