जेजुरी – येळकोट येळकोट जयमल्हार… सदानंदाचा येळकोट… असा जयघोष आणि भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मल्हार भक्तांनी देवदर्शन, कऱ्हा स्नानाची पर्वणी लूटत यंदाची दिवाळी साजरी केली. सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
यंदाच्या दिवाळीत सुमारे चार वर्षांनी खंडेरायाचा सोमवती उत्सव तसेच सणाच्या सुट्ट्या आल्याने रविवारपासूनच जेजुरी शहरात भाविकांनी गर्दी केली होती. प्रसादपुडे, पूजेचे साहित्य खेळणी, हार फुले,भंडारा खोबरे,मिठाईची दुकाने सजली होती. सोमवारी (दि. 13) नित्याची पहाटेची भूपाळी आरती विधिवत पूजा अभिषेक झाल्यानंतर सकाळी सातच्या सुमारास मुख्य इनामदार पेशवे, माळवदकरपाटील, खोमणेपाटील यांच्या सूचनेनुसार खंडेरायाच्या पालखी सोहळ्याने कऱ्हास्नानासाठी गडकोटातून प्रस्थान ठेवले.
यावेळी ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, सेवेकरी, पुजारी, देवसंस्थांनचे सर्व विश्वस्त, अधिकारी-कर्मचारी तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक उपस्थित होते. पालखी सोहळ्यापुढे मानाचा अश्व, छत्रचामरे, अब्दागिरी, घडशी समाजबांधवांच्या सनईच्या मंगलमय सुरात आणि भाविकांनी केलेल्या भंडारा खोबऱ्याच्या मुक्त उधळणीमध्ये सोहळा गडकोट पायरीमार्ग, मल्हार गौतमेश्वर मंदिर, जामा मशीद, धालेवाडी मार्गे कऱ्हा नदीतीरावर (पापनाश तीर्थ) पोहोचला. दुपारी माध्यानीच्या सूर्याच्या साक्षीने खंडोबा-म्हाळसादेवींच्या उत्सवमूर्तींना दहीदुधाचा विधिवत अभिषेक घालत कऱ्हा स्नान घालण्यात आले.
याबरोबर भाविकांसह ग्रामस्थ, खांदेकरी मानकरी यांनी स्नानाची पर्वणी लुटली. त्यानंतर धालेवाडीकर ग्रामस्थांचा मान घेत फुलाई माळीण कट्टा मार्गे सायंकाळी पालखी सोहळा जानाई मंदिर कट्ट्यावर विसावला रात्री उशिरा सोहळा गडावर दाखल होत रोजमुरा (चिमूटभर धान्य) वाटप होत सोहळ्याची सांगता झाली.
मागील सोमवतीला भाविक व खांदेकरी जखमी झाल्याच्या घटना पाहता यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. देवसंस्थानच्या वतीने कऱ्हास्नान मार्गावर पाणी, चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती गडाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.