जामखेड (प्रतिनिधी) – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राष्ट्रवादीचे युवा नेते प्रशांत शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांसह रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम करून आमदार प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत चोंडीत भाजपमध्ये प्रवेश केला. शिंदे यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना जोरदार धक्का बसला असून जवळा ग्रामपंचायत आता भाजपचा कब्जा झाली आहे.
जवळा ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जाताना कुठल्याही पक्षाचं लेबल लावलं नव्हतं, निवडणूक पुर्ण ताकदीने लढवली आणि जिंकली. आता गावाचा विकास करायचा असेल आणि गावाला वेगळेपण द्यायचं असेल तर आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. यामुळे पुन्हा एकदा एकमुखी निर्णय घेत आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
– प्रशांत शिंदे,(जवळा ग्रामविकास पॅनल)
प्रशांत शिंदे यांच्यासमवेत जवळा गावचे नवनिर्वाचित सरपंच सुशिल आव्हाड, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शितल प्रशांत शिंदे, सोनाली राहूल पाटील, रफिकभाई शेख, राधिका मारूती हजारे, भाऊसाहेब महारनवर, मंगल आव्हाड, नंदा कल्याण आव्हाड, हरिदास हजारे, सारिका रोडे, जयश्री कोल्हे यांच्यासह समर्थकांनी भाजपत प्रवेश केला. यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जवळा गावाच्या विकासासाठी आजवर भरघोस निधी दिला आहे. यापुढेही निधीची कमतरता पडू देणार नाही. विकासाच्या संदर्भात कुठलीही अडचण येऊ देणार नाही. तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. प्रशांत शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज पुन्हा पक्षात प्रवेश केला.
– प्रा.राम शिंदे,आमदार
चौंडी येथे आ. प्रा. शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या प्रवेश सोहळ्या प्रसंगी जिल्हा बॅंकेचे संचालक अंबादास पिसाळ, कर्जत बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, संचालक सचिन घुमरे, डॉ गणेश जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, सोमनाथ पाचरणे, डॉ सुनिल गावडे, तुषार पवार, अनिल गदादे, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे, बापुराव ढवळे, जवळा ग्रामविकास पॅनलचे प्रमुख मुरली अण्णा हजारे, काकासाहेब वाळुंजकर, दशरथ कोल्हे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.