pune news : आता तरूण वकिलांसाठी कायदा साक्षरतेसाठी इन्स्टाग्रामचा वापर करण्यात येत आहे. अतिशय सरळ, सोपा आणि सुटसुटीत भाषेत रिल्सद्वारे कायद्याचे धडे देण्यात येत आहेत. सोशल मिडीयावर हल्ली बरीच तरूणाई वेळ घालविताना दिसून येते.
यामध्ये, सर्वाधिक वेळ हा इन्स्टाग्रामवर तरूणाईकडून घालविण्यात येतो. सध्याच्या स्थितीत दिवसभरात इंन्स्टाग्रामवरील एकही रिल्स पाहिली नाही असा तरूण सापडणे कठीणच. त्याचाच आधार घेत पुण्यातील नवोदित वकिलांनी रिल्सद्वारे कायद्याचे ज्ञान देण्यास सुरवात केली आहे. या रिल्सनाही मोठी पसंती मिळत आहे.
समाजात वावरणारी प्रत्येक व्यक्ती ही कायद्यानुसार काम करते व त्यानुसार चालते. मात्र, याच सामान्य माणसाला कायद्याचे कोणतेही ज्ञान नसते. समाजामध्ये युवा पिढीमध्ये कायद्याबद्दल प्रचंड अज्ञान आहे.
कायदा म्हंटल की, लोकांच्या समोर अनेक कलम डोळ्यासमोर येतात. याबाबत कोणती माहिती हवी असल्यास तो त्या कायद्याची माहिती गुगलवर शोधतो खरं पण अत्यंत किचकट व अवघट असलेली कायद्याची भाषा सामान्य माणसाला कळत नाही.
समाजाला कायद्याविषयी सज्ञान बनविणे ही प्राथमिक गरज बनली असली त्यादृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे, सामान्य नागरिक हा न्यायालयाच्या प्रक्रियेबाबतीत अनभिज्ञ असल्याचे अनेकदा जाणवते.
अगदी स्वतः कडे असलेले पुरावेसुद्धा खटल्यात योग्यरीत्या सादर न करता आल्यामुळे न्याय मिळविण्यात अनेक अडचणी येतात हे न्यायालयीन प्रक्रियेत दररोज दिसून येते.
न्यायालयात हजर झाल्यानंतर अनेकदा अपुऱ्या सावधानतेमुळे खोट्या गुन्ह्यात अनेक जण अडकतात, भूलथापा आणि खोट्या आमिषांना बळी पडुन फसवणुकीचे सावज बनतात.
त्याअनुषंगाने न्यायालयात येणाऱ्या सर्वसामान्यांना यासर्व पेच-प्रसंगांना सामोरे जावे लागु नये यासाठी नागरीकांना कायद्याचे सहज व सोप्या भाषेत आकलन होण्यासाठी शहरातील नवोदित वकिलांनी इन्स्टाग्रामवरील रिल्सचा आधार घेतला आहे. रिल्सद्वारे नागरिकांनी कायद्याची माहिती देण्यात येत असल्याचे वकिलांकडून सांगण्यात येत आहे.
या गोष्टींवर असतो भर –
– उच्च, सर्वोच्च न्यायालयातील न्यायनिवाड्यावर भाष्य
– दिवाणी, फौजदारी कायद्यातील कलमांची ओळख
– लोकांना कायद्याबाबत असलेल्या शंकांचे निरसन
– न्यायालयालयीन कामकाजातील घटक व त्यांचे काम
– न्यायालयीन प्रक्रियेतील टप्पे त्यांसाठी लागणारा कालावधी
वकिलीच्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा उपयोग होणे काळाची गरज बनली आहे. ती गरज ओळखूनच मी तंत्रज्ञानाचा उपयोग करून सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृतीचा प्रयत्न करत आहे. लोकशाहीची मूल्ये तळागाळात रुजण्यासाठी लोकांना कायद्याची माहिती असणे गरजेचे आहे. ती माहिती छोट्या छोट्या व्हिडीओच्या माध्यमातून देत आहे.
– ऍड. आकाश मुसळे