पुणे: निर्मल वाधवानी याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावित पुणे महानगर जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) पीएमडीटीए-पीसीएलटीए वरिष्ठ मानांकन टेनिस स्पर्धेतील 50 वर्षांवरील गटात दुहेरी मुकुट संपादन केला. अन्य गटांमध्ये जॉय बॅनर्जी, जयंत येवले, मिलिंद घैसास यांनी विजेतेपद मिळविले.
डेक्कन जिमखाना येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत 35 वर्षावरील गटाच्या अंतिम फेरीत अव्वल मानांकित जॉय बॅनर्जी याने दहाव्या मानांकित संतोष दळवीचा 8-4 असा पराभव केला. 45 वर्षांवरील गटात जयंत येवलेने मंदार मेहेंदळेला 8-5 असे संघर्षपूर्ण लढतीनंतर हरविले. 55 वर्षावरील गटात मिलिंद घैसासने चारुदत्त साठेचा 8-3 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 50 वर्षांवरील गटात निर्मल वाधवानीने मनोज हार्डीकरचा 8-6 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. दुहेरीत निर्मल वाधवानीने राजेश मित्तलच्या साथीत मनोज हर्डीकर व गजानन कुलकर्णी यांचा 8-6 असा पराभव करून दुहेरी मुकुट पटकावला.
दुहेरीत अंतिम फेरीत 35 वर्षांवरील गटात शायनी बरेटो व विवेक खडगे यांनी जॉय बॅनर्जी व सुमंत पॉल यांचा 8-5 असा तर, 45 वर्षांवरील गटात सुनील लुल्ला व जयदीप वाकणकर या जोडीने राजेंद्र भोपळे व दत्तू शिंदे यांचा 8-5 असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
65 वर्षांवरील गटात विलास जावडेकर व हेमंत साठे यांनी सलीम वाडीवाला व राज भसीन यांचा 8-5 असा तर, 70 वर्षावरील गटात यशवंत बावकर व शरद नाटेकर यांनी सुभाष सुतार व प्रदीप कुंचूर यांचा 8-5 असा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. पारितोषिक वितरण समारंभ पीसीएलटीएचे अध्यक्ष नंदकुमार रोकडे, डेक्कन जिमखाना क्लबचे सरचिटणीस विश्वास लोहकरे, क्रीडा व युवा संचालनालयाचे सहसंचालक नरेंद्र सोपल यांच्या हस्ते झाला. यावेळी डेक्कन जिमखाना क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव अश्विन गिरमे, पीएमडीटीएचे सहसचिव हिमांशू गोसावी, मंदार वाकणकर, अजय कामत आणि निरीक्षक सुजन परब आदी उपस्थित होते.