मुंबई : राज्यातील आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकूण 19 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कॉंग्रेसने भाजपचेच माजी आमदार आशीष देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कॉंग्रेसकडून आतापर्यंत 140 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिनिधित्व करीत असलेल्या दक्षिण- पश्चिम नागपूर या मतदारसंघातून कॉंग्रेसने काटोलचे भाजपचेच माजी आमदार आशीष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे आशीष हे पुत्र आहेत. गेल्या निवडणुकीत काटोल मतदारसंघातून आशीष देशमुख भाजपच्या वतीने निवडून आले होते. सुरुवातीला आशीष मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील म्हणून ओळखले जात. नंतर देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांशी बिनसले आणि गेल्या वर्षी त्यांनी भाजपचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. नंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. फडणवीस यांच्यासमोर आव्हान उभे करण्याच्या उद्देशानेच आक्रमक प्रतिमा असलेल्या आशीष देशमुख यांना पक्षाने रिंगणात उतरविले आहे.