नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबाच्या संदर्भात बोलताना आक्षेपार्ह विधाने केली आहेत. एवढेच नाही तर त्यांनी मोदी यांच्या हिंदू असण्यावरही शंका उपस्थित केली आहे. त्यावर आता भारतीय जनता पार्टीचे बिहारमधील नेते गिरिराज सिंह यांनी टीका केली आहे. पंतप्रधान मोदी देशासाठी जगतात आणि देशासाठीच असतीलही. लालू यादव कसे हिंदू आहेत याची कल्पना नाही मात्र मोदी हे सनातन धर्माचे संवाहक आहेत असे गिरिराज यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की मोदी असे पंतप्रधान आहेत की जे पंतप्रधान झाल्यावर अमेरिकेत नाही जात तर नेपाळला जातात. तेथे पशुपतीनाथाचे दर्शन घेतल्यावर त्यांच्या डोक्यावर भस्म आणि हातात रूद्राक्ष असतो.
मोदी आणि सनातनच्या नात्याचा असा परिणाम झाला आहे की जे लोक आपल्या धर्मावरची श्रध्दा सोडून दर्ग्यावर चादरी चढवायला जात होते तेही आता जानवे घालून प्रभू रामाचे गुणगान करू लागले आहेत. इश्वराची कृपा असावी आणि लालू प्रसाद यादव यांच्यासारखा परिवारवाद होऊ नये एवढीच प्रार्थना.
गिरिराज म्हणाले की आज देशातील १४० कोटी जनता मोदी यांचे कुटुंब आहे. आम्ही सगळे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहोत. लालू यादव यांनी त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री केले. त्यांच्या मुलाला उपमुख्यमंत्री केले. त्यांना समाजात अन्य कोणी मागासलेले दिसले नाही? ते स्वत: तुरूंगात जाऊन आले आहेत आणि आता आपल्या कुटुंबालाही त्याच रस्त्याने पाठवत आहेत.