पॅरिस – गर्भपाताला राज्यघटनेची मान्यता देणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला आहे. गर्भपाताचा अधिकार राज्यघटनेनुसार मान्य करण्याच्या प्रस्तावाला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली.
संसदेत झालेल्या मतदानाच्यावेळी प्रस्तावाच्या बाजूने ७८० तर विरोधात ७२ मते पडली. राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असलेली ३ पंचमांश मते मिळाल्यामुळे ही घटनादुरुस्ती मान्य झाली.
अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने २०२२ मध्ये महिलांचा गर्भपाताच्या निर्णयाचा अधिकार रद्द केला आहे. त्यानंतर गर्भपाताला कायदेशीर संरक्षण मिळण्यासाठी फ्रान्समध्ये महिलांची मोहिम सुरू झाली होती.
गर्भपाताला मान्यता देणारा कायदा या वर्षाच्या प्रारंभीच संसदेने मंजूर केला आहे. आता गर्भपाताचा अधिकार फ्रान्समध्ये घटनादत्त झाला आहे. महिलांना आता खर् या अर्थाने निर्णयाचे स्वातंत्र्य मिळाले आहे, अशी प्रतिक्रीया यानिमित्ताने व्यक्त होते आहे.
राज्यघटनेतील दुरुस्तीचे देशातील जनतेने आणि संसदेतील बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे. या घटनादुरुस्तीचा आनंद साजरा करण्यासाठी लवकरच एक महोत्सव आयोजित केला जाईल, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी म्हटले आहे.
फ्रान्समध्ये १९७५ पासून गर्भपाताला कायदेशीर मान्यता आहे. गर्भारपणाचा कालावधी नंतरच्या काळात १२ आठवड्यांपर्यंत वाढवण्यातही आला होता.
मात्र त्यावर निर्बंध आणण्याचे प्रयत्न सुरू असताना महिला संघटनांनी गर्भपाताच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची मागणी लावून धरली होती.