बारामती : वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी बारामती तालुका अंगणवाडी सेविका कृती समितीने जोरदार आंदोलन केले. अंगणवाडी सेविकांनी यावेळी बारामती भिगवन रस्त्यावर पंचायत समिती समोर थेट रास्ता रोको केला. यावेळी अंगणवाडी सेविकांनी घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणाचा निषेध केला.
‘मानधन नको वेतन द्या’ अशा प्रकारच्या घोषणा देत बारामती शहरातील भिगवन चौक शारदा प्रांगण येथून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील अनेक चौकातून बारामती पंचायत समिती समोर मोर्चा आला. संतप्त अंगणवाडी सेविकांनी शासनाच्या तसेच अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत भिगवन रस्ता अडविला.
या रास्त रोकोमुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली. पंचायत समिती अधिकाऱ्यांनी पंचायत समिती समोर आंदोलन करण्यास विरोध केल्याने महिलांनी रास्ता रोको केला. पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांची समजूत काढत रस्ता खुला केला. त्यानंतर या महिलांनी पंचायत समिती समोर ठिय्या मांडला.