लोकांना खोट्या आशेला लावू नका

तज्ज्ञांनी दिला सावधगिरीचा इशारा

नवी दिल्ली-  करोनावर रामबाण ठरणाऱ्या लसीच्या जगभरात चाचण्या घेतल्या जात आहेत. अनेक देशांचे शास्त्रज्ञ आणि संस्था यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतातही तीन लसींचे संशोधन सुरू आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच 15 ऑगस्टच्या आपल्या भाषणात याबाबत माहिती दिली होती. सगळे ठिकठाक झाले, तर या वर्षाच्या अखेरपर्यंत लस उपलब्ध होउ शकते, असा विश्‍वास त्यांनी जागवला होता. मात्र, त्यांच्या या भूमिकेशी काही तज्ज्ञांनी असहमती व्यक्त केली आहे. लोकांना अंधारात ठेवू नका आणि खोट्या आशेला लावू नका, असा सल्लाही या मंडळींनी दिला आहे.

या संदर्भात पंतप्रधानांना एक संयुक्‍त पत्र पाठवत आपली भूमिका तज्ज्ञांनी मांडली आहे. इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन आणि इंडियन असोसिएशन ऑफ एपिडेमियोलॉजिस्ट यांनी याबाबत संयुक्‍त निवेदनही जारी केले आहे. तूर्त तरी आपल्याकडे कोणतीही लस उपलब्ध नाही व नजीकच्या भविष्यात ती मिळेल असे मानायचे कारण नाही. असा खोटा दिलासा टाळायला हवा. जेव्हा केव्हा सुरक्षित लस उपलब्ध होईल तेव्हा ती जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांनुसार वाटली जाईल.

शाळा पुन्हा सुरू करणे तसेच लॉकडाऊन समाप्त करण्याबाबतही तज्ज्ञांनी काही सूचना केल्या आहेत. करोनाच्या नियंत्रणासाठी आता लॉकडाऊनसारखे उपाय किंवा रणनीती बंद केली पाहिजे. त्याऐवजी जेथे कम्युनिटी ट्रान्समिशन झालेले नाही तेथेच प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्याबाबत विचार केला गेला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.

भारतात आज करोना केवळ शहरांपुरताच मर्यादित राहिला नसून त्याचा ग्रामीण भागांतही मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. बाधितांची संख्या वेगाने वाढते आहे. अशा वेळी सरसकट करण्याऐवजी निवडक लॉकडाऊन उपयुक्त ठरू शकते, अशी त्यांची सूचना आहे. तसेच प्रसार रोखण्यापेक्षा करोनाने होणारे मृत्यू रोखण्यावर विशेष भर देण्याची गरज आहे. लोकांनीही सावध राहात आपल्याला काही लक्षणे नाहीत ना याची खात्री करून घ्यावी. जेवढ्या लवकर शक्‍य आहे, तेवढ्या लवकर चाचणी करून घ्यावी आणि डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार पुढची कृती करावी. आशावादी राहणे चांगलेच. मात्र, लवकर लस उपलब्ध होणार नाही हे ध्यानात ठेवत वाईट स्थितीचा मुकाबला करण्याची रणनीतीही तयार ठेवली पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

स्थिती आता सामान्य करण्याच्या दिशेने पावले उचलणेही गरजेचे आहे. शाळा आणि शिक्षण संस्था क्रमबद्ध पद्धतीने सुरू केल्या जाऊ शकतात. ज्या भागात अगोदरच करोनाचे जास्त बाधित सापडले आहेत, अशा भागांच्या संदर्भात विशेष व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.