नवी दिल्ली – शिवसेनेचे मध्य प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष रमेश साहू यांची इंदूरमध्ये मंगळवारी रात्री उशिरा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी आलेली त्यांची पत्नी व मुलगी जखमी झाली आहे.
तेजाजी नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी आरएनएस भदोरिया यांनी बुधवारी सांगितले की, शिवसेनेचे मध्य प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष रमेश साहू (70 वर्षीय) हे इंदूर-खंडवा रोडवरील उमदीखेडा गावात ढाबा चालवत असत. याच ढाब्यात मंगळवारी रात्री उशीरा अज्ञात इसमाने त्याच्या छातीवर गोळी झाडून ठार मारले.
पुढे ते म्हणाले, हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. भदोरिया म्हणाले की, साहू हे अलीकडच्या काळात शिवसेनेत सक्रिय नव्हते. त्यांचे कुटुंबिय आणि जवळच्या लोकांकडून या हत्येबद्दल विचारपूस केली जात आहे, जेणेकरून घटनेसंदर्भात काही माहिती मिळू शकेल.
राजकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, साहू हे 1990 च्या दशकात शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यावेळी त्यांनी अनेक चळवळींचे नेतृत्व केले होते. साहू हे १० वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेनेचे मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्ष होते.
मृतक रमेश साहू यांच्या विरोधात तेजाजी नगर आणि सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या गोष्टींची दखल घेऊन पोलिस जुन्या शत्रुत्वाच्या प्रकरणांवर तपास करत आहेत. त्याचवेळी हत्येची माहिती समजताच सीएसपी, एएसपी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.