नवी दिल्ली – अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल हिलमध्ये घुसून धुडगूस घातल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप निश्चित केले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आरोपांमुळे ट्रम्प यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक दुसऱ्यांदा लढवणे अवघड होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांच्यावर यापूर्वीच गुन्हेगारी स्वरुपाचे काही आरोप आहेत. त्यामध्ये व्हाइट हाऊसमधील संरक्षण विषयाशी संबंधित काही गोपनीय कागदपत्रांच्या हाताळणीबाबतचे आरोप देखील आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प यांना उमेदवारी मिळण्याचा मार्ग खडतर बनलेला आहे. ट्रम्प यांच्यावर यासंदर्भात विशेष कौन्सिल जॅक स्मिथ यांनी हे आरोप निश्चित केले होते. आता जॅक स्मिथ यांनीच ट्रम्प यांच्यावर कॅपिटल हिल धुडगूस प्रकरणी आरोप निश्चित केले जाऊ शकतात, असे स्पष्ट केले आहे.
6 जानेवारी जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिलमध्ये झालेल्या धुडगूस प्रकरणी आपल्याविरोधात सुरू असलेला तपास थांबवण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका ट्रम्प यांच्यावतीने न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती. मात्र ट्रम्प यांची ही मागणी न्यायालयाने अमान्य केली आहे. ग्रॅन्ड ज्युरीच्या निष्कर्षावर प्रतिक्रिया देण्यासाठी ट्रम्प यांना 4 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ट्रम्प यांच्यावर आरोप निश्चित केले जाऊ शकतात आणि न्यायालयीन प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांना अटक देखील केली जाऊ सकते.
राजकीय सूडबुद्धीने कारवाई- ट्रम्प
ग्रॅन्ड ज्युरीकडून आपल्याला “लक्ष्य’ केले जात असल्याची प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. अध्यक्षीय निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी आणि राजकीय सूडबुद्धीने आपल्यावर आरोप निश्चित केले जाणार आहेत. आपले राजकीय करिअर संपवण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून न्याय विभागाचा एखाद्या हत्याराप्रमाणे वापर केला जात आहे. ते अतिशय नीच काम करू इच्छितात आणि लोकांना घाबरवू इच्छित आहेत. आपल्या देशासाठी हा अतिशय वाईट आणि अंधःकारमय कालखंड असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
कॅपिटल हिल प्रकरण
2021 च्या अध्यक्षांच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्याकडून ट्रम्प यांचा पराभव झाला होता. मात्र ट्रम्प यांनी हा पराभव मान्य करण्यास नकार दिला होता. निवडणुकीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. बायडेन यांना निवडणुकीतील विजयाचे प्रमाणपत्र दिले जाण्यापूर्वी ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी अमेरिकेची संसद असलेल्या कॅपिटल हिलच्या इमारतीमध्ये घुसून प्रचंड धुडगूस घातला होता. यावेळी सुरक्षा रक्षक आणि निदर्शकांमध्ये जोरदार धुमश्चक्री देखील झाली होती.