कोल्हापूर- घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडा (घण) घालून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. पन्हाळा तालुक्यातील माले येथे आज पहाटे ही धक्कादायक घटना घडली असून पती दत्तात्रय पाटील स्वतःहून कोडोली पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण पन्हाळा तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पत्नी शुभांगी पाटील (वय 30) यांचा 10 वर्षांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील दत्तात्रय पाटील (वय 35) याच्याशी विवाह झाला होता. त्यांना 8 आणि 4 वर्षांची दोन लहान मुलं सुद्धा आहेत. गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू होते. आज पहाटे सुद्धा दोघांमध्ये झालेल्या वादातून पती दत्तात्रय पाटील याने पत्नीच्या डोक्यात लोखंडी घन घालून निर्घृण हत्या केली. त्यानंतर दत्तात्रय पाटील स्वतःहून कोडोली पोलिसांत दाखल होऊन घडलेल्या प्रकाराबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असून घडलेल्या घटनेबाबत अधिक माहिती घेत असून पती विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.