कलावंतांसाठी विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ

सरकार सकारात्मक ः आमदार अतुल बेनके यांची माहिती

नारायणगाव (पुणे) -महाराष्ट्रातील 50पेक्षा जास्त क्षेत्रातील कलावंत, कलाकार, तमाशा कलावंत, लोक कलावंत, तंत्रज्ञ यांच्यासाठी विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळाची स्थापन करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली असून सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दिली आहे.

 

नारायणगाव कुकडी विश्रामगृहात आज (दि. 25) आयोजित पत्रकार परिषदेत आमदार अतुल बेनके यांनी माहिती दिली. यावेळी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदचे कार्याध्यक्ष संभाजीराजे जाधव, मालती इनामदार, मुसा इनामदार, अविष्कार मुळे, कैलास सावंत नारायणगावकर, मोहित सावंत नारायणगावकर, विशाल इनामदार, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिरीष बोऱ्हाडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

आमदार अतुल बेनके म्हणाले की, महाराष्ट्रातील लोकनाट्य तमाशा कलाकारांबरोबरच सर्व कलाकार, पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ, गोसावी, भजन मंडळी, मुरली, बॅंडवाले, नकलकार, शाहीर, गोंधळी, पेंटर, मूर्तीकार, साहित्यिक, लेखक कीर्तनकार, गायक, वादक नाट्यकलावंत, संगीतकार वाघ्या, मुरळी, झाडीपत्तीतील कलाकार यांच्यासह विविध क्षेत्रातील कलाकारांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून त्या महामंडळाला राष्ट्रीय लोककलावंत असलेल्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली असून त्यास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी अनकुलता दर्शविली आहे.

 

लवकरच हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे. तसेच कलाकारांना म्हाडाच्या माध्यमातून घरकुल योजना राबविण्यासाठी गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 5 टक्के कोटा देण्यास संमती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कलाकारांच्या प्रश्नाच्या प्रस्तावास तात्काळ मान्यता देण्याचे आश्वासन दिले असून शरद पवार यांनी देखील कलाकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री यांना पत्र पाठविणार आहेत, अशी माहिती बेनके यांनी दिली.

 

लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले, तामिळनाडूमध्ये आर्टिस्ट वेल्फेअर बोर्ड आहे. त्या धर्तीवर राज्यात आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून या महामंडळाला 500 ते 600 कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली असून त्यास सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी अनकुलता दर्शविली आहे. यावेळी रघुवीर खेडकर, संभाजी राजे जाधव यांनी कलाकारांच्या मागणी संदर्भात माहिती दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.