नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने ओमायक्रॉनचा धोका वाढत चालल्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व स्पर्धा रद्द केल्या आहेत. या निर्णयाचा फटका भारतीय संघाला आणि पर्यायाने दौऱ्यावरदेखील बसू शकतो.
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील काही संघातील खेळाडूंना करोनाची बाधा झाल्याचे आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. दोन्ही संघात पहिला सामना 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट आढळल्यापासून जगावर पुन्हा एकदा करोनाचे संकट निर्माण झाले आहे.
आफ्रिकेत होणारे देशांतर्गत सामने बायोबबल वातावरणात होणार नाहीत. संघ सामने खेळण्यासाठी आल्यावर घेण्यात आलेल्या चाचणीत काही खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्याचे वृत्त समोर आले आहे. खेळाडूंच्या सुरक्षेची कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे.
भारताविरुद्धच्या मालिकेबाबत मंडळाने हे स्पष्ट केले की, संबंधित मालिका अतिशय कठोर बायोबबल वातावरणात घेतली जाणार आहे. लवकरच भारताविरुद्धच्या मालिकेबाबत निर्णय घेतला जाईल.