South Africa pacer Kwena Maphaka made history : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा 17 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज क्वेना माफाका अंडर-19 विश्वचषकात चांगली कामगिरी करत आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सहा विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला होता. या विश्वचषकात माफाकाने तिसऱ्यांदा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे आणि आता अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासात तीनदा पाच बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.
1. क्वेना माफाकाने अंडर-19 विश्वचषकात आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात केली होती. 19 जानेवारीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने 38 धावांत 5 बळी घेतले होते. याच कारणामुळे दक्षिण आफ्रिकेने उत्कृष्ट विजय संपादन केला होता.
2. यानंतर 31 जानेवारीला झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात क्वेना माफाकाने 10 षटकांत 34 धावा देत 5 बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 9 विकेटने जिंकला.
3. त्यानंतर माफाकाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्यांदा पाच बळी घेतले. या सामन्यात त्याने अवघ्या 21 धावांत 6 बळी घेत आपल्या संघाला 119 धावांनी मोठा विजय मिळवून दिला.
याआधी क्विना माफाकानेही टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता की तो जसप्रीत बुमराहपेक्षा चांगला गोलंदाज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यानंतर आयसीसीशी झालेल्या संभाषणात माफाका म्हणाला होता की, जसप्रीत बुमराह खूप चांगला गोलंदाज आहे पण कदाचित मी त्याच्यापेक्षा चांगला आहे.
याशिवाय माफाकाने कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची विकेट घेण्याची इच्छाही व्यक्त केली होती. तो म्हणाला होता की, जर मी दक्षिण आफ्रिका संघात सामील होईपर्यंत विराट कोहली कसोटी क्रिकेट खेळत राहिला तर नक्कीच मी त्याची विकेट घेईल. तसेच यावेळी माफाकाने कोहलीचे सर्वकालीन महान फलंदाज असे वर्णन केले होते.