गॅले – यजमान श्रीलंका संघाने वेस्ट इंडीजचा दुसऱ्या कसोटी सामन्यात 165 धावांनी पराभव केला. या विजयासह श्रीलंकेने वेस्ट इंडीजविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. यापूर्वी श्रीलंकेने याच मैदानावर झालेली पहिली कसोटी 187 धावांनी जिंकली होती.
दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाथुम निसांकाच्या 73 धावांच्या खेळीनंतरही त्यांना केवळ 204 धावांपर्यंतच मजल मारता आली. वेस्ट इंडीजकडून विरसामी पेरमुलने 5, तर जोमेल वारीकेनने 4 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडीजने पहिल्या डावात 253 धावा करत आघाडी घेतली. त्यात क्रेग बर्थव्हाइटने सर्वाधिक 72 धावा केल्या. श्रीलंकेकडून रमेश मेंडीसने 6 गडी बाद केले. श्रीलंकेने दुसरा डाव सुरू केल्यावर प्रमुख फलंदाजांच्या अपयशानंतर धनंयज डीसील्व्हाने दमदार दीडशतकी खेळी केली.
श्रीलंकेने आपला दुसरा डाव 9 बाद 345 धावांवर घोषित केला व वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 297 धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा दुसरा डाव अवघ्या 132 धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेकडून रमेश मेंडीस व लसित एंबुलडेनिया यांनी प्रत्येकी 5 बळी घेतले. श्रीलंकेने हा सामना 164 धावांनी जिंकला व दोन्ही कसोटी सामन्यांतील विजयासह ही मालिकाही जिंकली.