द हेग (नेदरलॅन्ड) – गाझा पट्ट्यातील रफाह शहराच्या संरक्षणासाठी त्वरित उपाय योजना करण्याची मागणी करणारी दक्षिण आफ्रिकेने दाखल केलेली याचिका जागतिक न्यायालयाने फेटाळली आहे.
एवढेच नाही तर यापूर्वी गेल्या महिन्यात लागू केलेल्या उपाय योजनांची अंमलबजावणी इस्रायलने करावी, अशी सूचनाही जागतिक न्यायालयाने केली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्याच याचिकेवर सुनावणी करताना २६ जानेवारी रोजी दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन इस्रायलने करायला हवे. हे निर्देश रफाहसह संपूर्ण गाझा पट्ट्यासाठी लागू व्हायला हवेत. यासाठी नव्याने प्रतिबंधक उपाय योजनांचे निर्देश देण्याची गरज नाही, असे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने म्हटले आहे.
गाझा पट्ट्यातील पॅलेस्टिनींची सुरक्षा आणि संरक्षण जपण्यासह जागतिक न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करणे वांशिक नरसंहार विरोधी ठरावांतर्गत इस्रायलसाठी पूर्ण बंधनकारक आहे, असे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने म्हटले आहे.
जागतिक न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करत रफाह या गाझा पट्ट्यातील दक्षिणेकडच्या शहरात इस्रायलने लष्करी कारवाई सुरू केली आहे.
त्यावर जागतिक न्यायालयाने त्वरित दखल घेऊन प्रतिबंधक आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दक्षिण आफ्रिकेने इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये दाखल केली होती. त्यावर ही सूचना न्यायालयाकडून करण्यात आली आहे.