जगभरातील काही मोजक्याच देशांमध्ये क्रिकेट लोकप्रियतेच्या बाबतीत आघाडीवर आहे. जगभरातील असंख्य चाहतेही क्रिकेटवर जीवापाड प्रेम करतात. त्याचबरोबर चाहत्यांमध्ये क्रिकेटसंबंधीच्या अनेक खमंग विषयांवर सातत्याने चर्चा होत असतात. यातीलच एक विषय म्हणजे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील आरक्षण. या लेखातून आपण दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघातील आरक्षण पद्धतीवर प्रकाश टाकणार आहोत.
होय, दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघात आरक्षण आहे
दक्षिण आफ्रिकेत 20 व्या शतकात अनेक दशके, कृष्णवर्णीयांना कसोटी क्रिकेटमध्ये भाग घेण्याची परवानगी नव्हती. या धोरणामुळे, आयसीसीने दक्षिण आफ्रिकेचा 1970 मध्ये क्रिकेट खेळणार्या राष्ट्राचा दर्जा काढून घेतला होता. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने कृष्णवर्णीयांना सर्व प्रकारच्या क्रिकेट संघात कृष्णवर्णीयांना समाविष्ठ करण्याची हमी दिल्यानंतर 1992 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याचे पुनरागमन झाले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने 2007 आणि 2016 मध्ये आरक्षणाच्या पद्धतीत काही बदल केले. 2016 च्या बदलानुसार आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये संघात 5 श्वेत आणि 6 अश्वेत खेळाडूंचा समावेश असेल. 6 अश्वेत खेळाडूंपैकी दोन खेळाडू मुळ आफ्रिकन वंशाचे असतील.
श्वेत आणि अश्वेत खेळाडूंचे योगदान तितकेच
लान्स क्लुस्नर, केप्लर वेसेल्स, हॅन्सी क्रोनिए, अॅलन डोनाल्ड, बोएटा डिपेनर, हर्शेल गिब्स, एबी डिव्हिलियर्स, डु प्लेसिस, जेपी ड्युमिनी, मोर्ने मॉर्केल आणि डेल स्टेन ही काही नावे आहेत जी आफ्रिकन भाषिक पार्श्वभूमीतील आहेत आणि श्वेत आहेत. या दिग्गजांनी दक्षिण आफ्रिकेकडून अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे.
दुसरीकडे मखाया अँटोनी हा आरक्षण पद्धतीचा लाभ मिळणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला कृष्णवर्णीय क्रिकेटपटू ठरला. त्याच्यापाठोपाठ लोनवाबो सोसोबे, अॅरोन फंगीसो आणि कागिसो रबाडा सारखे कृष्णवर्णीय खेळाडूंचेही दक्षिण आफ्रिकेसाठी तितकेच योगदान राहिले आहे.
आज दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट लोकप्रियतेच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावर आहे. हर्षल गिब्स आणि मखाया अँटोनीसारखे खेळाडू कोटा पद्धतीचा फायदा घेत तिथे पोहोचले आहेत. हर्शेल गिब्स हा दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक होता, जो क्षणार्धात खेळ पालटवू शकायचा. यासोबतच मखाया अँटोनी गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत दुसर्या क्रमांकावर पोहोचला होता.
पीटरसनसारख्या दिग्गजाला दक्षिण आफ्रिका मुकली
दुसरीकडे या व्यवस्थेमुळे दक्षिण आफ्रिकेला केविन पीटरसनसारखा खेळाडू गमवावा लागला. आरक्षणामुळे दक्षिण आफ्रिकेत कमी संधी मिळेल या भीतीने पीटरसन इंग्लंडकडून खेळला. त्याने इंग्लंड गाठले आणि जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये आपले नाव कोरले.
संधी अभावी अनेक खेळाडू दक्षिण आफ्रिका सोडत आहेत
2016 नंतर, आरक्षण प्रणाली काटेकोरपणे लागू करण्यास सुरुवात केल्यामुळे अनेक खेळाडू इंग्लंड आणि इतर देशांकडे वळू लागले. मॉर्ने मॉर्केल आणि जोहान बोथा आता ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत, तर काइल अबॉट, सायमन हार्मर आणि डुआन ऑलिव्हियर आता इंग्लंडमध्ये स्थायिक झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विजे 2021 च्या टी20 विश्वचषकात नामिबियाकडून खेळला. विशेष म्हणजे 2021च्या टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले एकूण 8 खेळाडू वेगवेगळ्या संघांकडून खेळत आहेत.
….म्हाणून दक्षिण आफ्रिकेत अजूनही आरक्षणाची गरज आहे
आरक्षण पद्धतीद्वारे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघात, कृष्णवर्णीय खेळाडूंवर गेल्या अनेक दशकांतील झालेला अन्याय पुन्हा संतुलित करण्याचा प्रयत्न आहे. 50 वर्षांहून अधिक काळ, कृष्णवर्णीय क्रीडापटूंना कठोर गोरे-अल्पसंख्याक नियमांतर्गत त्यांच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यास मनाई होती.
नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की दक्षिण आफ्रिकेतील केवळ आठ टक्के शालेय मुलांमध्ये गोरे नसलेल्या वंशाच्या मुलांना खेळात प्रवेश आहे. शिवाय, दक्षिण आफ्रिकेतील सर्व स्तरांवर कृष्णवर्णीय खेळाडूंची प्रगती, गरिबी आणि सुविधांच्या अभावामुळे खुंटलेली आहे. आणि सर्व खेळात अजूनही श्वेतवर्णीय खेळाडूंचेच वर्चस्व आहे.
1994 मध्ये ब्रिटिशांच्या राजवटीच्या समाप्तीपासून आतापर्यंत 85 खेळाडूंचे रक्तपात झाले आहेत. त्यामुळे ही दरी भरून काढण्यासाठी दक्षिण आफ्रिका क्रीडा मंत्रालयाचे मत आहे की, आरक्षण पद्धतीची गरज आहे.