वडगाव मावळ, (वार्ताहर) – गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला वडगाव शहराचा प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यात विविध ७७ आरक्षणे, नवीन प्रशस्त रस्ते, आयटी हब, भाजी मार्केट, नाट्यगृह आदी सोयीसुविधांचा समावेश आहे.
नगर पंचायतीच्या स्थापनेनंतर प्रथमच शहराचा विकास आराखडा तयार झाल्याने नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. त्यामुळे तो पाहण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
मावळ तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या वडगाव शहराचा कारभार पूर्वी ग्रामपंचायत पाहत होती. फेब्रुवारी २०१८ मध्ये शासनाने ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर केले. १५ जुलै रोजी नगर पंचायतीची पहिली निवडणूक झाली होती.
वडगाव शहराचा विकास आराखडा करण्यासंबंधीचा ठराव २९ जानेवारी २०२१ रोजी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी मिळून केला होता. त्यानंतर मोनार्च एजन्सीने अस्तित्वातील जमीन वापर नकाशा (इएलयू) तयार केला होता. तर सहायक संचालक नगररचना विभागाच्या नगररचना अधिकाऱ्यांनी शहरातील विकास आराखड्याचा दुसरा टप्पा म्हणजे प्रस्तावित जमीन वापर नकाशा तयार केला.
वीस वर्षांच्या विकासाचे नियोजन
शहराचे क्षेत्रफळ सुमारे १३ स्क्वेअरकिलोमीटर एवढे असून त्यानुसार विकास आराखडा करताना आगामी वीस वर्षांच्या विकासाच्या दृष्टीने व सुनियोजित शहर करण्यासंदर्भात सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. मुख्य रस्ता (कोर्ट ते शिवाजी चौक) १५ मीटर तर गणपती मंदिरापासून ढोरेवाड्यात जाणारा रस्ता नऊ मीटरचा ठेवण्यात आला आहे.
वडगाव ते सांगवी हा रस्ता १८ मीटर, वडगाव कातवी रस्ता २४ मीटर, खंडोबा मंदिर ते तळेगाव साखळी रस्ता १८ मीटर ठेवण्यात आला आहे. शहरातील सर्व भागांना जोडतील अशा नऊ ते अठरा मीटर रुंदीच्या नवीन रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. रेल्वे स्टेशन ते विश्रामगृहाच्या बाजूने थेट हायवे, दत्त मंदिर ते हायवे, नगरपंचायत ते हायवे, शिवाजी चौक ते हायवे हे गावठाणातून हायवेला जोडणारे चार नवीन रस्ते,
ब्राम्हणवाडी ते उर्से खिंड असा डोंगर पायच्या लगत ३६ मीटरचा बायपास रोड, कोर्ट, आठवडे बाजार व नगरपंचायत इमारत विस्तार, प्ले ग्राउंड, क्रीडांगण, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापनसाठी एसटीपी प्लॅन्ट, नाट्यगृह व संग्रहालय, सांस्कृतिक हॉल, पार्किंग, खुल्या जागा आदी सुमारे ७० ते ७५ सुविधांचा त्यात समावेश आहे.
प्रमुख आरक्षणे
– गावठाणात पाच तर गावठाण हद्दीबाहेर ७२ आरक्षणे.
– नागरिकांना परवडणारी घरे बांधण्यासाठी चार आरक्षणे
– चार ठिकाणे भाजी मंडई व आठवडे बाजारासाठी, १४ ठिकाणी प्ले ग्राउंड व गार्डन.
– चार ठिकाणी स्मशान भूमी व दफनभूमी.
– दोन जलशुद्धीकरण केंद्रे, दोन सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे.
– दोन दवाखाने, दोन शैक्षणिक केंद्रे, चार मनोरंजन केंद्र
– रिंगरोडलगत ट्रक टर्मिनल, कातवीगावच्या हद्दीत सुमारे २५ एकर क्षेत्रावर आयटी हब,
– पाच एकरवर इलेक्ट्रिक सब स्टेशन, दोन चार्जिंग स्टेशन.
– आरक्षणात कोणाच्या मोकळ्या जागा अथवा घरे जात असल्यास त्यांना शासन नियमानुसार मोबदला किंवा टीडीआर दिला जाईल.
प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या अवलोकनासाठी नगरपंचायत कार्यालयात लावण्यात आला असून नागरिकांनी काही हरकती व सूचना असल्यास त्या एक महिन्याच्या आत लेखी स्वरूपात नगरपंचायत कार्यालय अथवा सहाय्यक संचालक नगररचना कार्यालयात दाखल कराव्यात. डॉ. प्रवीण निकम, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक.