सेऊल : कुत्री अथवा मांजरे पाळणे हा आधुनिक काळातील जीवनशैलीचा भाग असला तरी ही जीवनशैलीच आता अनेक कुटुंबांना संकटात टाकत आहे. पाळीव प्राण्यांमुळे आग लागण्याच्या घटना गेल्या काही वर्षांमध्ये वाढल्या असून त्यामुळे दक्षिण कोरिया प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे.
गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये मांजरामुळे आणि कुत्र्यांमुळे 100 पेक्षा जास्त आगीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे दक्षिण कोरिया प्रशासनाने पाळीवप्राणी पाळणाऱ्या सर्व लोकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या असून या प्रकारच्या आगीच्या घटना घडल्यास त्या नागरिकांनाही जबाबदार धरण्यात येणार आहे.
घरात पाळण्यात येणाऱ्या मांजरामुळे 100 पेक्षा जास्त आगीच्या घटना घडल्याचे लक्षात आले आहे. घरगुती गॅससाठी ज्या शेगड्या वापरण्यात येतात त्या अतिशय सेन्सिटिव्ह असतात त्याला नुसता टच जरी झाला तरी ती शेगडी सुरू होऊ शकते.
मांजरे घरात फिरत असताना त्यांच्या हालचालींमुळे या शेगड्या सुरू होतात आणि त्या चालूच राहिल्यामुळे आगीच्या घटना घडतात असे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. जानेवारी 2019 ते नोव्हेंबर 21 या काळात मांजरामुळे आगीच्या तब्बल एकशे सात घटना घडल्या असून त्यामुळे संबंधित घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
त्यामुळे साऊथ कोरिया प्रशासनाने आता विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्याप्रमाणे गॅसच्या शेगडी पासून ज्वालाग्रही पदार्थ लांब ठेवाव्यात अशी एक सूचनाही देण्यात आली आहे. त्यामुळे जर चुकून ती शेगडी सुरूच राहिली तर आग पसरणार नाही, अर्थात पाळीव प्राण्यांमुळे आग लागण्याच्या घटना फक्त दक्षिण कोरिया पुरताच मर्यादित नसून अमेरिकेला ही समस्या सतावत आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत पाळीव प्राण्यांमुळे अमेरिकेत आग लागण्याच्या एक हजार पेक्षा जास्त घटना घडल्या आहेत.