सातारा – आमच्या घराण्याचे पुरावे आम्हालाच मागणाऱ्या व्यक्तीला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही. आता महाराष्ट्रात कोणीही खा. संजय राऊत यांच्या वक्तव्याला फार महत्त्व देत नाही, असे प्रत्युत्तर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राऊत यांनी राजघराण्यावर केलेल्या टीकेला दिले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्क अभियान सुरू असून, त्यासाठी खा. राऊत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान साताऱ्यातील शाहू कलामंदिरात काल (दि. 3) झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना, खा. संजय राऊत यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे आणि राजघराण्यावर टीका केली होती. या टीकेचा समाचार आ. शिवेंद्रसिंहराजेंनी घेतला.
आपल्या “सुरुची’ या निवासस्थानी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, छत्रपतींच्या घराण्याबद्दल आदर आहे, असे म्हणता तर संभाजीराजे छत्रपती यांना खासदारकीचे तिकीट का दिले नाही? त्याऐवजी खा. संजय पवार यांना तिकीट देऊन जखमेवर मीठ चोळले. आमच्या राजघराण्याचे पुरावे आम्हालाच मागणाऱ्या व्यक्तीला आमच्या घराण्यावर बोलायचा अधिकार नाही. आता महाराष्ट्रात कोणीही संजय राऊत यांच्या वक्तव्याचा फार महत्त्व देत नाही.