राज्यपालांची विद्यापीठांना सूचना : परिस्थितीचा सर्वंकष आढावा
पुणे – करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी विविध विषयांवर चर्चा केली.
सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, तसेच विद्यापीठांच्या उन्हाळी परीक्षा सामायिक पद्धतीने घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरूंना केली. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनीदेखील सहभाग घेतला.
विद्यापीठांनी आपल्या आकस्मक निधीचा वापर करोना परीक्षण प्रयोगशाळा सुरू करणे, मास्क आणि सॅनिटायझर निर्मिती तसेच इतर समाजोपयोगी साहित्य तयार करण्यासाठी करावा, अशीही सूचना राज्यपालांनी केली. व्हर्च्युअल क्लास रूम तसेच तंत्रज्ञानावर आधारित इतर ऑनलाइन सुविधांच्या मदतीने विद्यापीठांनी अध्यापन सुरू ठेवावे. प्रत्येक विद्यापीठाने स्थलांतरित कामगार, बेघर आणि निराश्रीत लोकांना भोजन सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. सर्व कुलगुरूंनी आपल्या वेतनाचा काही भाग शासनाला योगदान म्हणून देता येईल का याचा विचार करावा, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा सामायिकपणे घेता येतील का, याचा अभ्यास करून सरकारला अहवाल सादर करण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती गठीत केली असून समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे. विद्यापीठांमध्ये करोना टेस्टिंग लॅब सुरू करण्याबाबत तसेच कमी किंमतीचे व्हेंटिलेटर निर्माण करण्याबाबत विद्यापीठांच्या प्रयत्नांना सरकार सर्वतोपरी मदत करेल.
– उदय सामंत, उच्च शिक्षणमंत्री.