हिंजवडी – मुळशी, मावळ, खेड, हवेली, शिरूर या पाच तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022-23 गळीत हंगामाकरिता गाळपास आलेल्या 4,98,385 मे. टन उसाकरिता उसाचा अंतिम दर प्रति मे. टन रुपये 2834 निश्चित केला आहे. त्यापैकी उसाची वाजवी व किफायतशीर किंमत (एफ.आर.पी.) प्रति मे. टन रुपये 2634 प्रमाणे या पूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खाती वर्ग केलेली आहे.
एफ. आर. पी. व्यतिरिक्त प्रति मे. टन रुपये 200 मधून श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर बांधकामासाठी निधी म्हणून प्रति मे. टन रुपये 10 प्रमाणे रक्कम वजा जाता प्रति मे. टन रुपये 190 याप्रमाणे रक्कम रुपये 9 कोटी 46 लाख 93 हजार 150 शेतकऱ्यांच्या बॅंक खाती वर्ग केलेली आहे. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले यांनी दिली.
कारखान्यांच्या तुलनेने डिस्टीलरी प्रकल्प कार्यान्वीत झालेला नसतानाही तसेच गाळपासाठी पाच तालुक्यांच्या कार्यक्षेत्रातून ऊस येत आहे व ऊस तोडणी वाहतूक खर्च जास्त असतानाही चांगला ऊस दर शेतकऱ्यांना दिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.कारखान्याने कार्यक्षेत्रात गळीत हंगाम 2023-24 करिता उपलब्ध उसाच्या गाळपाची संपूर्ण तयारी झालेली असून, कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.
या व्यतिरिक्त सन 2011-12 गळीत हंगामामध्ये गाळपास आलेल्या उसास एफ. आर. पी. व्यतिरिक्त जादा केलेल्या तरतुदीची रक्कम प्रति मे. टन रुपये 100 प्रमाणे ऊस पेमेंट मा. संचालक मंडळ सभेत झालेल्या निर्णयाप्रमाणे मार्च 2024 अखेर शेतकऱ्यांच्या बॅंक खाती वर्ग करणार असलेची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नवले व उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी दिली.