पुणे – हिलस्टेशन, गडकिल्ले, समुद्रकिनारे या ठिकाणी दिवाळी साजरी करण्याबरोबरच दिवाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचे नियोजन सुरू आहे. पूर्वी मामाच्या गावाला जाण्यास पसंती दिली जायची. मात्र, आता कोकण अथवा थंड हवेच्या ठिकाणी दिवाळी सुट्टी साजरी करण्याची पद्धत रुढ झाली आहे.
दिवाळी, ख्रिसमस, उन्हाळी सुट्या, सलग जोडून येणाऱ्या सुट्या यांचे नियोजन आधी एक-दोन महिने होते. त्यानुसार दिवाळीच्या सुट्टयांमधील एमटीडीसीच्या रिसॉर्टचे बुकींग येत्या दि.30 नोव्हेंबरपर्यंत फुल्ल झाले आहे. एमटीडीसीचे रिसॉर्ट जरी फुल्ल झाले असले तरी निवास-न्याहारीची व्यवस्था स्थानिक नागरिकांकडून केली जाते. त्यांना रोजगार मिळावा आणि पर्यटकांची सोय व्हावी, यासाठी ही सुविधा निर्माण केली आहे.
याविषयी “एमटीडीसी’चे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले, दिवाळी साजरी करण्यासाठी नागरिक आता शहराच्या बाहेर आणि निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यास पसंती देत आहे. थंडीचा आनंद घेण्यासाठी काहींनी महाबळेश्वर, पाचगणीला पसंती दिली आहे. तर गड किल्ल्यांची आवड असणाऱ्यांनी रायगड, प्रतापगड गाठण्याचे ठरवले आहे. तसेच ऐतिहासिक स्थळे अंजिठा, वेरुळ या स्थळांकडे येण्याचा पर्यटकांचा ओढा आहे.
समुद्रकिनाऱ्याची ओढ असणाऱ्यांनी तारकर्ली, अलिबाग, गणपतीपुळे, दिवेआगार या स्थळांची निवड केली आहे. हॉटेल, रिसॉर्टमध्ये दिवाळीनिमित्त आकर्षक सजावट, रोषणाई करण्यात येते. पणत्या, आकाशकंदील आणि दारात काढलेल्या रांगोळ्या यांमुळे हॉटेलमध्येच दिवाळीचा अनुभव घेता येतो.
काही महत्त्वाचे मुद्दे…
- समुद्रकिनारे : हर्णे, वेळास, गणपतीपुळे, श्रीवर्धन, दिवेआगार, गुहागर, तारकर्ली, हरिहरेश्वर, वेंगुर्ला, वेळणेश्वर
- अभयारण्ये, जंगल सफारी : ताडोबा, नवेगाव, चिखलदरा,, सागरेश्वर, कर्नाळा, कास, राधानगरी
- ऐतिहासिक स्थळे, लेणी : एलिफंटा, वेरूळ, अजिंठा, कार्ला, लोणार सरोवर
- हिलस्टेशन : महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, भिमाशंकर, लोणावळा, खंडाळा, ताम्हिणी घाट, वाई, पन्हाळा, माळशेजघाट, अंबोली, भंडारदरा, चिखलदरा, तापोळा
- गड किल्ले : रायगड, प्रतापगड, पन्हाळा, लोहगड, राजमाची, देवगिरी, जंजिरा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग,