पुणे – प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीला जोडून आलेले शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे नागरिक फिरण्यासाठी विविध पर्यटनस्थळी जाण्याची तयारी केली आहे. पर्यटकांनी कोकण, गडकिल्ले, महाबळेश्वर आणि ऐतिहासिक स्थळे, लेणी याठिकाणी जाण्यास पसंती दिली आहे.
सलग सुट्ट्यांमुळे सहकुटुंब, मित्र, नातेवाईक यांच्यासह पर्यटनाला जाण्याचा कल वाढत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळांच्या क्लबच्या सहलीही निघत आहेत.. देवदर्शनासह कोकणात जाण्याकडे जास्त कल वाढत आहे. एमटीडीसीच्या तारकर्ली, आंबोली, हरिहरेश्वर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, महाबळेश्वर, माथेरान, कार्ला येथील बुकिंग फुल्ल झाले आहेत.
एमटीडीसीचे रिसॉर्ट जरी फुल्ल झाले असले तरी निवास-न्याहारीची व्यवस्था स्थानिक नागरिकांकडून केली जाते. स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा आणि पर्यटकांची सोय व्हावी, यासाटी ही सुविधा निर्माण केली आहे. निवास न्याहारीची व्यवस्था कोठे आहे, याबाबतची माहिती एमटीडीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक या ठिकाणी बुकींग करून राहण्याची व्यवस्था करू शकतात, असे एमटीडीसीकडून सांगण्यात आले.
शहराच्या बाहेर आणि निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यास पसंती देत आहे. थंडीचा आनंद घेण्यासाठी काहींनी महाबळेश्वर, पाचगणीला पसंती दिली आहे. तर गड किल्ल्यांचे हौस असणाऱ्यांनी रायगड, प्रतापगड गाठण्याचे ठरविले आहे. समुद्रकिनाऱ्याची ओढ असणाऱ्यांनी अलिबाग, गणपतीपुळे, दिवेआगार या स्थळांची निवड केली आहे.