वॉशिंग्टन :- केवळ देशातच नाही तर जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा दिवाळी हा असा सण सर्वत्र लोकप्रिय आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन खासदार ग्रेस मेंग यांनी दिवाळीचा दिवस “फेडरल हॉलिडे’ अर्थात सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.
हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन यांच्यासह विविध धर्माचे लाखो अमेरिकन लोक दिवाळी साजरी करतात. म्हणूनच हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केला पाहिजे.
व्यवसायाने वकील असलेल्या मेंग यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात दिवाळी हा सण देशातील फेडरल सुट्टी म्हणून घोषित करण्यासाठी दिवाळी दिवसाचे विधेयक मांडले आहे. मे महिन्यात मांडण्यात आलेल्या विधेयकाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत अन्य संसद सदस्यांकडून नकारात्मक प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. त्यामुळे आशा आहे की लवकरच हे विधेयक संसदेत मंजूर होऊ शकते.
न्यूयॉर्क शहरातील क्वीन्स येथे वाढलेल्या 47 वर्षीय खासदार मेंग म्हणाल्या की, ही केवळ एक दिवसाची सुट्टी नाही. जे लोक दिवाळी साजरी करतात, त्यांच्यात सहभागी होऊन इतर लोकांनाही या सणाचे महत्त्व कळेल. एक आशियाई अमेरिकन म्हणून माझ्यासाठी दिवाळीचा सण महत्त्वाचा आहे. जगभरातील हजारो न्यूयॉर्कवासी आणि अब्जावधी लोक दिवाळी साजरी करतात. या दिवशी आपल्याला सुट्टी मिळेल याची खात्री बाळगा.
मेंग पुढे म्हणाल्या की, दिवाळीच्या दिवशी शाळा बंद ठेवाव्यात यासाठी आम्ही 10 वर्षांहून अधिक काळ लढा देत आहोत.भारतीय अमेरिकनांचे अमेरिकेसाठी मोठे योगदान आहे. भारतीय अमेरिकन या देशातील सर्वात मोठ्या आशियाई अमेरिकन लोकसंख्येपैकी एक आहेत.