शिरगाव – पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा आणि अपघात असे जणू समिकरणच झाले आहे. या चौकात गेल्या काही महिन्यांत अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहीजण कायमचे जायबंदी झाले आहेत.
सोमाटणे टोलनाका ओलांडून मुंबईच्या दिशेने जाताना चौकाच्या पुढे द्रुतगती मार्गाकडे याच ठिकाणावरून वाहने जातात. याशिवाय, सोमाटणे चौक परंदवडी, धामणे, बेबडओहोळ, शिरगाव, दारु, साळुंब्रे, गहुंजे, सांगवडे, गोहुने आदी गावांना जोडतो. गेल्या काही वर्षांत येथे मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढली आहे. यामुळे या चौकात दररोज एक तरी छोटा-मोठा अपघात होतो. याठिकाणी वाहतूकीचे नियोजन करण्यासाठी पोलिसाची केवळ नावापुरतीच नियुक्ती केली आहे. जर पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी या चौकात असतील तर वाहन चालकांवर वचक राहतो. कोणीही वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करीत नाही. येथील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नुकतीच एक पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे.
पोलीस चौकीतही नाहीत अन् चौकातही नाहीत
काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकाऱ्यांनी चौकीत नको चौकात दिसा, असा आदेश दिला होता. मात्र सोमाटणे येथील पोलीस चौकीतही दिसत नाही आणि सोमाटणे फाटा चौकातही दिसत नाही. त्यामुळे, वाहनचालक बेशिस्तपणे वाहन चालवतात. वाहतूक कोंडी निर्माण होते. चौकात मुख्य रस्त्यालगत काही वाहने रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे उभी केली.
फेरीवाल्यांचीही संख्या वाढत आहे
सोमाटणे फाटा येथील चौकात दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. मुख्य व सेवा रस्त्याच्यामध्ये अनेक हातगाडीवाले गाडी लावत आहेत. येथे खरेदी करण्यासाठी अनेक वाहन चालक रस्त्यातच गाडी उभी करतात. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होते.
ऊसाचीही मोठ्या प्रमाणात वाहतूक
कासारसाई येथे असलेल्या साखर कारखान्यावर जाणाऱ्या ऊसाच्या गाड्या याच चौकातून जातात. तसेच खिंडीमध्ये उतार असल्याने वाहनांचा वेग प्रचंड असतो. अनेकदा वाहन चालकांना वाहन नियंत्रित करणे अवघड होते. तसेच बाइक रायडरही प्रचंड वेगाने जातात. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही अवघड होते. त्यातूनच अनेक भीषण प्राणांतिक अपघात होतात.
मनुष्यबळाची कमतरता असल्याने सोमाटणे फाटा येथे एकच कर्मचारी नियुक्त केला आहे. मात्र त्यास एकाच ठिकाणी न थांबता त्याचे ठिकाण बदलावे लागते. त्याप्रमाणे, कधी चौकात तर कधी टोलवर नाक्यावर पोलीस कर्मचारी असतात. शिवाय बंदोबस्त असेल तर तिकडे पाठवावे लागतात. त्यामुळे, कधी कधी वाहतूक कोंडी होते. यावर लवकरच सकारात्मक कार्यवाही करू.
– ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, देहूरोड