मांजरी – पहाटेचे झुंजूमुंजू, मंद वारा आणि हळूहळू अंधाराची चादर दूर करीत होणारा अरूणोदय, अशा प्रसन्न वातावरणात शेवाळेवाडी येथील दोन दिवसांच्या दिवाळी पहाट संगीत महोत्सवाची उत्साहात सांगता झाली. श्री शंभूराजे सांस्कृतिक व क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी दिली.
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, प्रवीण पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, पालिका उपायुक्त प्रसाद काटकर, निवृत्त वरिष्ठ पोलिस निरिक्षक दत्तात्रय चव्हाण, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल शेवाळे, माजी सरपंच प्रतिमा शेवाळे, पंढरीनाथ शेवाळे यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन झाले. महोत्सवाचे हे नववे वर्ष आहे.
जेष्ठ गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांच्या संतवाणीने या महोत्सवाची सुरुवात झाली. सखी मंद झाल्या तारका, देव देव्हाऱ्यात नाही, फिटे अंधाराचे जाळे, ज्योती कलश झलके, दिव्यादिव्यांची ज्योत सांगते तुझी न् माझी प्रीति, नाही खर्चिली कवडीदमडी, रूपे सुंदर सावळागे माये, तोच चंद्रमा नभात, कानडा राजा पंढरीचा, रंगू बाजारला जाते हो जाऊद्या, आकाशी झेप घेरे पाखरा, येई ओ विठ्ठले, जाळीमंदी पिकली करवंद अशा भक्ती व भावोत्कट गितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
फडके व शेफाली कुलकर्णी यांनी ही गिते सादर केली. सुकन्या जोशी, तुषार आग्रे, तुषार दीक्षित, प्रणव कुलकर्णी, प्रणव हरिदास, आदित्य आपटे यांनी त्यांना साथ दिली. दुसऱ्या पर्वात गायक अजित कडकडे यांच्या अभंगवाणीने सर्वांची माने जिंकली. सहाय्यक पोलिस उपायुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, उद्योजक प्रमोद बडदे, नानासाहेब बाजारे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा घेतली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी विजय कोद्रे, चंद्रकांत शेवाळे, संजय कारले, संभाजी हाके, संदीप शेवाळे, राजेंद्र घुले, प्रीतम शेवाळे, राम खेडेकर, शाम खवले, सुनील उडतले, वैशाली हरपळे, माधुरी मोरे, रेखा शेवाळे, भारती शेवाळे, मनीषा कोद्रे, राधिका शेवाळे, रसिका कुंभारकर यांनी संयोजन केले.