संगीता खाडे यांचा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

कोल्हापूर  (प्रतिनिधी) – राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेल्या गळतीमध्ये कोल्हापूरदेखील आग्रक्रमावरती आहे. कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कोल्हापूरच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता खाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठविला आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादीचे कार्यालय देखील आता बंद झाले आहे. हे कार्यालय संगीता खाडे यांच्या निवासस्थानानजीकच्या जागेत होते. परंतु त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पक्षाचे जिल्हा कार्यालयाला देखील कुलूप ठोकण्यात आले आहे.

वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. मात्र त्या भाजपच्या संपर्कात असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, गेले काही महिने त्या जिल्हा राष्ट्रवादीमधील घडामोडींवरुन नाराज होत्या. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या त्या निकटवर्तीय समजल्या जातात. दहा वर्षे त्यांनी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीवर सदस्य म्हणून काम पाहिले आहे. सध्या त्यांच्या सदस्यपदाचा कार्यकाल संपला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.