महिलांच्या टी-20 सामन्यात शफालीच्या कामगिरीबाबत उत्सुकता

सूरत: दक्षिण आफ्रिका व अध्यक्षीय संघ यांच्यात येथे शुक्रवारी महिलांचा टी-20 सराव सामना होणार असून या सामन्यात भारताची 15 वर्षीय खेळाडू शफाली वर्मा हिच्या कामगिरीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

शफाली या सर्वात लहान खेळाडूने स्थानिक सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे तिला आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताच्या वरिष्ठ संघात स्थान देण्यात आले आहे. तिची गुणवत्ता पाहण्यासाठीच तिला अध्यक्षीय संघात संधी मिळाली आहे. तिच्याबरोबरच मानसी जोशी व पूजा वस्त्रकार या वेगवान गोलंदाजांसाठीही हा सामना महत्त्वाचा आहे. यष्टीरक्षक सुषमा वर्मा हिच्याकडे अध्यक्षीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले असून देविका वैद्यची उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आफ्रिकेचे नेतृत्व सुनी लुस करीत आहे. भारताविरूद्धच्या सामन्यांपूर्वी सराव म्हणून त्यांच्यासाठी आजची लढत उपयुक्‍त ठरणार आहे. भारत व आफ्रिका यांच्यातील टी-20 चे तीन सामने येथे होणार आहेत तर तीन वनडे सामने बडोदा येथे खेळविले जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.