अबाऊट टर्न: गोंधळ

हिमांशू

गोंधळ हा आपला स्थायीभाव आहे. डोक्‍यात कोणताही गोंधळ नसलेला भारतीय माणूस क्वचितच आढळेल. आपल्याला गोंधळलेल्या अवस्थेत ठेवणारी परिस्थिती कधी-कधी निर्माण होते तर कधी-कधी निर्माण केली जाते हे कबूल; पण “काही का असेना…’ असं म्हणून गोंधळ डोक्‍यातून काढून टाकणारे खुशालचेंडू आपल्याला हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच भेटतात. सध्या आपल्या देशात खरोखर मंदी आहे की नाही? असलीच तर ती कोणकोणत्या क्षेत्रांत आहे? नोकऱ्या जाताहेत की मिळताहेत? आपल्याकडे गुंतवणुकीस पोषक वातावरण आहे की गुंतवणूक काढून घेण्याजोगं? या प्रश्‍नांची खरी उत्तरं किती जणांना माहीत आहेत? अहो, पाच ट्रिलियन म्हणजे पाचावर किती शून्य, या विषयावरून आपल्याकडे न्यूज चॅनेलवर वाद झाले आणि गोंधळही उडाला.

नाणार येणार की जाणार की गुंडाळणार की बारगळणार की आणणार की नेणार याबाबतचा गोंधळही आता वाढलाय. “नाणारचं जे झालं तेच आरेचं होणार,’ ही गर्जना मुंबईत झाली आणि लगेच “नाणार परत येणार,’ अशी गर्जना कोकणात झाली. आता आरे कॉलनीतल्या जंगलाचं हेच होणार की काय, असा गोंधळ उडणं स्वाभाविकच नाही का? काहीजण म्हणतात, गोंधळ फक्‍त तुमच्या-आमच्या डोक्‍यात असतात. “वरच्या लेव्हलवर’ सगळं फिक्‍स असतं. होणार की नाही, झालं तर काय होणार आणि कसं होणार, याबाबत गोंधळात टाकणाऱ्यांमध्ये स्पष्टता असते म्हणे!
अर्थात, सामान्य माणसाच्या मनात उडणारा गोंधळ नेहमीच त्याला त्रासदायक ठरतो असं मात्र नाही बरं का! कधी-कधी हा गोंधळ सुखद असू शकतो. कधी-कधी तर गोंधळ माणसाला मालामालही करतो.

आता हेच पाहा ना, तमिळनाडूतल्या तिरुपूरममध्ये गुणशेखरन नावाच्या एका विमा एजंटाला मेसेज आला, की त्याच्या बॅंक खात्यात पन्नास लाख रुपये जमा झालेत! आपल्या खात्यात एवढी मोठी रक्‍कम कुणी जमा केली? कशाबद्दल? असा गोंधळ उडणं स्वाभाविक आहे ना? पण हा सुखद गोंधळ नाही का? परंतु असे गुंते सोडवायचे नसतात, एवढी बुद्धी गुणशेखरनला नक्‍कीच होती. त्यानं व्यवस्थित प्लॅनिंग केलं. जे पैसे कुठून आले हेच ठाऊक नाही, अशा रकमेतून त्यानं घर घेतलं. मुलीचं लग्नही त्याच रकमेतून धुमधडाक्‍यात करून दिलं. चुकून झालेली ही चूक समजायला तब्बल आठ महिने लागले आणि तोपर्यंत गुणशेखरनचं नशीब चांगलंच फळफळलं. ही रक्‍कम कुठली, याची माहिती तर अधिकच रंजक आहे. ज्या बॅंकेत गुणशेखरन आणि त्याच्या पत्नीचं खातं होतं, तिथंच सार्वजनिक बांधकाम विभागाचं खातं होतं. खासदार आणि आमदारांच्या स्थानिक परिसर विकास योजनेची ही रक्‍कम होती आणि चुकून ती गुणशेखरनच्या खात्यात पडली.

बॅंकेच्या अधिकाऱ्यांना चूक समजली तेव्हा त्यांनी सगळी रक्‍कम पुन्हा बॅंकेत भरण्याचा हुकूम गुणशेखरनला दिला. पण तो कुठून भरणार पैसे? ते तर खर्चही झाले होते. अखेर बॅंकेनं सीबीआयकडे तक्रार केली, गुन्हा दाखल झाला आणि प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टानं गुणशेखरन आणि त्याच्या पत्नीला तीन वर्षांसाठी तुरुंगात पाठवलंय. अशा घटना पाहून वाटतं, सामान्य माणसाच्या जगण्यात उडणारे गोंधळ आरे आणि नाणारसारखे कायम राहिले, तर किती बरं होईल!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here