राष्ट्रवादी कॉंग्रेस, आमदार नीलेश लंके प्रतिष्ठान व लामखडे परिवाराचा उपक्रम
नगर, दि.28 (प्रतिनिधी) -लॉकडाऊनमुळे कामगार व आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत कामगार वर्गाची सर्वाधिक संख्या असलेल्या एमआयडीसी जवळील निंबळक (ता.नगर) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस, आमदार निलेश लंके प्रतिष्ठान व लामखडे परिवाराच्या वतीने 350 कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
अक्षय्य तृतीयाच्या संध्येला व रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर गरजूना किराण्याचे वाटप करण्यात आले. निंबळक मध्ये घरपोच किराणा सामान वाटपाचे प्रारंभ आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. यावेळी माजी सरपंच विलास लामखडे, अजय लामखडे, केतन लामखडे, माजी सरपंच किसन कोतकर, उपसरपंच घनश्याम म्हस्के, बाळासाहेब कोतकर, नाना दिवटे, भाऊराव गायकवाड, अनिल सुर्यवंशी, प.स. सोंडकर, सचिन काळे, संतराम दळवी आदी उपस्थित होते.
एमआयडीसी जवळ असल्याने निंबळक मध्ये सर्व समाज घटकातील कामगार वर्ग राहतात. गावाची लोकसंख्या देखील मोठी असून, हातावर पोट असलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. लॉकडाऊनचा महिन्याहून अधिक कालावधी लोटत आला असताना सर्वसामान्य कामगार व आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांचे जीवण जगणे अवघड झाले आहे.
पैसे पुर्णत: संपले असल्याने उपासमारीची वेळ या कुटुंबीयांवर ओढवली असून, या संकट काळात कोणीही नागरिक उपाशी राहू नये, ही जाणीव लक्षात घेऊन लामखडे परिवाराने मदतीचा हात पुढे करुन गरजूंना आधार दिला असल्याचे अजय लामखडे यांनी सांगितले.निंबळक मधील सहा प्रभागातील 350 गरजू कुटुंबीयांची माहिती संकलित करुन प्रत्येक प्रभागात वाहनाद्वारे गरजूंच्या दारापर्यंत किराणा साहित्याचे किट पोहचविण्यात आले. अक्षय्य तृतीयाच्या संध्येला व मुस्लिम बांधवांच्या रमजान निमित्त मदत घरी आल्याने गरजूंनी आभार मानले.