सातारा -शहरातील करोगर्स्तांची संख्या वाढल्याने पालिका सतर्क झाली असून केटेंनमेंट झोनमधील परिसरासह जिल्हा कारागृहाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. राधिका रस्त्याच्या परिसरातील रस्ते बंद केल्यामुळे त्या रस्त्यावर शुकशुकाट आहे. सातारा शहरात करोनाचे चार रुग्ण गेल्या दोन दिवसांत आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सिव्हिल रुग्णालयातील परिचारिका, पुणे येथून सातारा जिल्हा कारागृहात आलेले दोन कैदी व प्रतापगंज पेठेतील 27 वर्षीय युवक याचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सातारा शहराच्या अंर्तगत भागात करोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस व आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असून सदरबझारच्या कंटेनमेंट झोनमधील आरोग्य यंत्रणेचे लक्ष प्रतापगंज पेठ ते गार्डन सिटी राधिका रोडवर केंद्रित झाले. पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे व उपमुख्याधिकारी संचित कृष्णा धुमाळ यांनी शुक्रवारी गार्डन सिटी या इमारतीची पाहणी करून तो संपूर्ण परिसर आरोग्य विभागाकडून जंतुनाशक फवारणी करून घेण्यात आला. पोलिसांनी सदर बझारच्या जोडीला भोसले मळा ते मल्हार पेठ भागावर ड्रोनने बारकाईने लक्ष ठेवले आहे.
नागरिकांच्या बारीकसारीक हालचालीसुद्धा टिपल्या जात आहेत. कर्मवीर कॉलनी, मल्हार पेठ, जगताप कॉलनी या भागातील 613 कुटुंबांची पहिल्या टप्प्यात तातडीने थर्मल स्कॅनर व कीटसह आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रतापगंज पेठ ते काळा राम मंदिर परिसर शनिवारी सील करण्यात येऊन राधिका चौक ते ऐक्य कॉर्नर परिसरात तब्बल दोन तास जंतुनाशक फवारणी करण्यात आली. कोटेश्वर मैदान ते राधिका चौक ते ऐक्य कॉर्नर, नामदेव झोपडपट्टी परिसर येथील सर्व परिसर पाणी मारून स्वच्छ करण्यात आला. राधिका रोड, बारटक्के चौक ,कोटेश्वर कॉलनी या भागात जादा घंटागाडयांची सोय करून तेथील कचरा उचलण्याची सोय करण्यात आली. विनाकारण रस्त्यावर कोणी फिरल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा शाहूपुरी पोलिसांनी दिला आहे .
राधिका रोडवर पूर्ण सन्नाटा
करोनाबाधित सापडल्याने प्रतापगंज पेठ- सदाशिव पेठ मार्केट- बुधवार नाका (बारटक्के चौक) तो संपूर्ण परिसर पोलीसांनी सील करून टाकला. राधिका रस्त्याला येऊन मिळणारे सर्व छोटे मोठे रस्ते बंद करण्यात आले. या भागाला पोलिसांचा गराडा वाढला. शाहूपुरी भागातून येणारी वाहतूक आपत्कालीन सेवा वगळता मोळाचा ओढा मार्गे वळवण्यात आली. सुरक्षिततेच्या कारणास्तव राधिका रोड ते प्रतापगंज पेठ या मार्गावर पोलिसांनी शंभर टक्के लॉकडाऊन वाढविला. सातारा पालिकेनेसुद्धा याच लॉकडाऊन झोनमधील “होम टू होम’ तपासणी चार आरोग्य पथकामार्फत गतिमान केली.
जिल्हा कारागृह यंत्रणासुध्दा हडबडली
पुणे येथून सातारा जिल्हा कारागृहात आलेल्या कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. जिल्हा आरोग्य यंत्रणेने कारागृहातील कैद्याचे स्राव घेतले. पुण्यावरून आलेल्या कैद्यांना स्वतंत्र ठेवण्यात आले होते. बाधित कैदी कच्चे कैदी होते. शनिवारी सकाळी तुरूंगातील अधिकारी व कैदी यांचे स्राव तपासणीसाठी घेण्यात आले. थर्मल स्कॅनरद्वारे त्यांच्या शरीराचे तापमान मोजण्यात आले. उपमुख्याधिकारी संचित धुमाळ व आरोग्य विभागाच्या दोन पथकांनी दुपारी बारा वाजता जिल्हा कारागृहाच्या बराकीसह अंर्तगत भागात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.