पुणे(प्रतिनिधी) : महापालिका निवडणूकांमधे राजकीय, सामाजिक समिकरणे जपण्यासह, निवडणूकीत आयत्या वेळी तिकिट कापलेल्या अथवा तिकिट न दिलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला राजकीय पक्षांकडून महापालिकेत थेट स्विकृत नगरसेवक म्हणून पाठविले जाते. मात्र, आता पर्यंत महापालिकांमध्ये जास्तीत जास्त पाच जणांचीच नियुक्ती केली जात होती. मात्र, आता राज्यशासनाने ही संख्या दहा पर्यंत वाढविण्यास तत्वत: मान्यता दिली आहे.
त्यामुळे, निवडणूक नाराज होणाऱ्यांची चांदी होणार असून राजकीय पक्षांनाही बंडखोरांना थंड करण्यासाठी चांगलीच संधी मिळणार आहे. तर महापालिकेत निवडून आलेल्या पक्षाच्या सदस्यांच्या संख्येच्या प्रमाणात स्विकृत सदस्य निवडून दिले जातात. या निर्णयामुळे आता पुणे महापालिकेत दहा स्विकृत नगरसेवक असणार आहेत.
काय आहे शासनाचा सुधारीत निर्णय
महानगरपालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या दृष्टीने नामनिर्देशित सदस्यांची संख्या सुधारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानुसार मुंबई महानगरपालिका अधनियमाच्या कलम 5(1)(ब) मध्ये दहा नामनिर्देशित सदस्य व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 5(2)(ब) मध्ये दहा टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाहीत किंवा दहा पालिका सदस्य, यापैकी जे कमी असेल अशी सुधारणा करण्याचा तत्वत: निर्णय घेण्यात आला.
याबाबत मा.महाधिवक्ता, महाराष्ट्र राज्य यांचे प्रथम अभिप्राय घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 मधील कलम 5(1)(ब) व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 मधील कलम 5(2)(ब) मध्ये नामनिर्देशित करावयाच्या पालिका सदस्यांचे प्रमाण निश्चित केले आहे. त्यानुसार सध्या महानगरपालिकांतील नामनिर्देशित करावयाच्या पालिका सदस्यांची संख्या पाच आहे