अधिकारी, शिक्षक, कर्मचाऱ्यांबाबत शिक्षण विभागाचे आदेश
पुणे – राज्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेत लावता यावा, यासाठी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामकाजातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी यांना संचारबंदीतून विशेष बाब म्हणून सूट द्यावी, असे आदेश राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
राज्यात इयत्ता बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत तर इयत्ता दहावीची परीक्षा 3 ते 23 मार्च या कालावधीत घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मार्चमध्ये आधी जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी व नियमनासंदर्भात बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल 10 जूनपूर्वी घोषित करणे आवश्यक आहे. उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झाल्याशिवाय निकाल जाहीर करता येणार नाहीत व पुढील शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया ही राबविता येणार नाही. त्यामुळे संचारबंदीतून अधिकारी, शिक्षक, कर्मचारी यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून सूट देण्यात यावी, असे म्हटले आहे.
शिक्षण विभागाने दिलेल्या सूचना
राज्य व नऊ विभागीय शिक्षण मंडळातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांना प्रवास करताना खासगी अथवा सार्वजनिक वाहने वापरता येतील. प्रत्येकाकडे मंडळाने दिलेले लेखी आदेश व ओळखपत्र असलेच पाहिजे अशा अटींचा समावेश करण्यात यावा. कामाचे स्वरुप ही निश्चित करुन देण्यात येणार आहे. यात उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रावरून किंवा पोस्टातून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे पाठविणे, शिक्षक अथवा शिपायामार्फत उत्तरपत्रिका शाळेतून परीक्षकांच्या घरी घेऊन जाणे, परीक्षकांकडून नियमकांकडे उत्तरपत्रिका पोहचविणे, त्या संबंधित विभागीय मंडळाकडे जमा करणे आदी कामे लॉकडाऊनच्या कालावधीत करण्यास मुभा देण्यात यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना देण्यात आलेल्या आहेत.