मी सिद्धार्थ चौगुले. मूळचा साताऱ्याचा. सांगलीतील वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक. केल्यानंतर टेक्सास ए अँड एम येथे कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये एम. एस. केले. अमेरिकेत गेल्या पाच वर्षांपासून वॉटर ट्रिटमेंट प्लांट्सचे प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्ट करतोय. सध्या फ्लोरिडा येथे ब्लॅक अँड विच कंपनीमध्ये फिल्ड इंजिनिअर म्हणून काम करत आहे. टॅम्पाजवळच्या डनईडन शहराला शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या आरओ सिस्टिममध्ये माझे कॉन्ट्रॅक्टर साईडचे काम सुरु आहे. या शुद्धीकरण प्लान्टची कपॅसिटी साधारणपणे 3.5 कोटी लिटर इतकी आहे. हे काम थांबले तर लोकांना पिण्याचे पाणी मिळणार नाही व अडचणी येतील.
करोनामुळे संपूर्ण अमेरिकेत 95 टक्के लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा देण्यासाठी 5 टक्के लोक काम करत आहेत. संपूर्ण शहराला पिण्याचे पाणी पुरवणे ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे आम्हाला येथे आठवड्याचे 60 तास म्हणजेच एरव्हीपेक्षा दीडपट काम करावे लागत आहे. साहजिकच हे काम जीवाची बाजी लावून करावे लागतेय. कारण येथे प्रत्यक्ष साइटवर रोज किमान 100 लोकांचा संपर्क येतो. ते सगळेजण रोजच इतर अनेक लोकांच्या संपर्कात येत असतात. येथे आम्ही रोजच मृत्यूचे तांडव पाहतोय.
इतर वेळेस गजबजलेल्या परिसरात आता पूर्णपणे आणि भयाण शांतता आहे. पूर्ण अमेरिकेतून रोज सरासरी 2000 च्या दरम्यान लोक दगावताहेत. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस करोना पॉझिटिव्ह होत मृत्यू पावत आहेत. त्यामुळे टेन्शन तर नक्कीच आहे. आसपास घडणाऱ्या या घटनांचा आपल्या मानसिकतेवर परिणाम होतच असतो.
असे असले तरीही ही आणीबाणीची वेळ आहे. भारतातील आईची अस्वस्थता, कुटुंबातल्या लोकांना असणारी काळजी, त्यामुळे वाढणारे ताण समजू शकतो. परंतु, हे जागतिक संकट आहे. नैतिक मूल्यांची बैठक नोकरी सोडण्याचा विचार करु देत नाही. आम्ही रोज 12 तास काम करत असलो तरी कंपनीने आम्हाला चांगल्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी दररोज एक तास करोना सेफ्टीबद्दल आढावा घेतात. एखादी साइट करोनाबाधित आहे असे निदर्शनाला आल्यास ती 14 दिवसांसाठी बंद केली जाते आणि संपूर्ण डिसइन्फेक्शन केले जाते.
सुरुवातीच्या काही काळात सुरक्षा किट्सचे शॉर्टेज होते. परंतु, आता साइटवर काम करणाऱ्या प्रत्येकासाठी लाखो रुपयांचे सॅनिटायझर आणि फेसशिल्ड उपलब्ध करून दिलेले आहेत. दिवसातून दोन वेळा प्रत्येकाचे टेम्परेचर घेतले जाते व 99 डिग्री फॅरनहाइटपेक्षा जास्त तापमान असेल तर त्यांना घरी पाठवले जाते. डॉक्टरचे सर्टिफिकेट असल्याशिवाय पुन्हा काम सुरु करता येत नाही.
रोज काम संपवून घरी जाण्यापूर्वी व जेवणाच्या आधी लेबर व सर्व स्टाफचे ग्लोव्हज आणि कन्स्ट्रक्शनसाठी वापरले जाणारे सगळे साहित्य ब्लीचने डिसइन्फेक्ट केले जाते.
इतर देशांच्या व अमेरिकेच्या मानाने आपल्या भारत सरकारने करोनाला कंट्रोलमध्ये ठेवण्यात खूपच चांगले काम केले आहे. त्यातील एक म्हणजे देशभरात लॉकडाऊनचा निर्णय लवकर घेतला. येथील सरकारने बीचेस, मॉल्स, हॉटेल्स लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यायला उशीर लावला. तसेच फेब्रुवारीमध्ये अमेरिकेच्या शाळा, कॉलेजेसना स्प्रिंग ब्रेकची एक आठवडा सुट्टी असते. बरीच मुले पर्यटनासाठी फ्लोरिडा, टेक्सास, न्यूयॉर्क अशा प्रेक्षणीय राज्यात पर्यटनासाठी गेली आणि बरोबर त्याच काळात करोना विषाणूचा प्रचंड प्रसार झाला.
त्यामुळे येथील करोना रूग्णांच्या भीतीदायक आकडेवारीवरुन व सद्यपरिस्थितीत भारतात तिसऱ्यांदा वाढवलेला लॉकडाउनचा निर्णय पाहता त्याचे गांभीर्य ओळखून हे आवर्जून सांगावेसे वाटते की, “स्टिच इन टाइम सेव्झ नाइन’ या न्यायाने तुम्ही सर्वांनी घरात राहून स्वत:ला, कुटुंबीयांना वाचवा व आपले आजच्या करोना लढ्यातल्या सैनिक असणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, प्रशासकीय अधिकारी व आपले सरकार यांना पूर्णपणे साथ द्या. अमेरिकेतील सध्याची गंभीर परिस्थिती पाहता आपण भारतीयानी हे अत्यंत गांभीर्याने घेतले तरच पुढील अनर्थ टळणार आहे हे नक्की.