मुंबई – भारतीय चित्रपटसृष्टीला अभिनयाची वाट दाखवणारे “नटसम्राट’ पद्मविभूषण, दिलीपकुमार काळाच्या पडद्याआड गेले. ते 98 वर्षांचे होते. गेले दोन वर्ष त्यांची प्रकृती तोळामासा होती. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रविवारी (दि. 6) मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र लाखो चाहत्यांच्या प्रार्थना आणि डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न अपुरे पडले. त्यांनी सकाळी साडे सात वाजता अखेरच श्वास घेतला अन् त्यांच्या अभिनयावर निस्सिम प्रेम करणाऱ्या चाहत्यांच्या भावनांचा बांध फुटला. बॉलिवूड तसेच राजकीय क्षेत्रातून दिलीप कुमार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला करत, दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. शरद पवार म्हणतात कि… एकदा जेजुरीत दिलीप कुमार यांच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं.
आम्हाला त्याची कुणकुण लागली. मग आम्ही मित्रांनी सायकली काढल्या आणि सायकलवरून प्रवास करत जेजुरी गाठली. त्यावेळी मला पहिल्यांदा लांबून का होईना दिलीप कुमार यांना पाहता आलं.
नंतर मी राजकारणात आलो. सरकारमध्ये विविध पदावर असताना दिलीप कुमार यांच्याशी माझा दोस्ताना झाला. ते लोकप्रिय आणि महान अभिनेते होतेच. पण माणूस म्हणूनही तितकेच ग्रेट होते, अशा शब्दात शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्याबाबतच्या आठवणी जागवल्या.
आपल्या मित्राच्या निधनाने शरद पवारही व्यथित झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देतानाच दिलीप कुमार यांना पहिल्यांदा पाहिल्याचा जेजुरीतील किस्साही सांगितला.