पुणे – ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला अखेर बेडया ठोकण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला बंगळुरूमधून पळून जाताना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याला वैद्यकीय चाचणीसाठी अंधेरी येथे आणण्यात आले. मात्र यावेळी ललित पाटील माध्यमांसमोर मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं. कोणाकोणाचा हात आहे, ते सर्व सांगेन,’ असे ललित पाटील म्हणाला आहे.
ललित पाटील 300 कोटींची ड्रग्ज फॅक्टरी चालवतो. त्यामुळे त्याचे नेटवर्क देशभरात पसरले आहे. यामुळे पोलिसांना ललित पाटीलला पकडणे खूप कठीण गेले. “मी लवकरच मीडियाशी बोलेल. मी ससूनमधून पळून गेलो नाही तर मला पळवलं आहे. मला पळवण्यामागे कोणा-कोणाचा हात आहे, हे लवकरच सांगणार आहे,” असे ललित पाटील म्हणाला. बंगळुरूमधून पळून जाताना ललित पाटीलसह त्याच्या साथीदारालाही अटक केली आहे. ललित पाटील आणि त्याच्या साथीदाराला अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे.
ललित पाटीलच्या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणाची आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, साकीनाका पोलिसांनी सापळा रचून ललित पाटीलला अटक केली आहे. ललित पाटील पुण्याहून नाशिकला गेला होता असे समोर येत आहे. नाशिकनंतर तो इंदोरला गेला. इंदोरनंतर तो गुजरात सुरतला गेला. यानंतर तो पुन्हा नाशिकला आला. यानंतर धुळे, संभाजीनगर, कर्नाटक, बंगळूर, चेन्नईपर्यंत प्रवास केला. यानंतर तो श्रीलंकेत जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्याआधीच त्याला ताब्यात घेण्यात आले.