psi somnath zende suspended : ऑनलाइन गेमिंगमधून करोडपती झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे आनंद हा क्षणिकच ठरला आहे. कारण पोलीस खात्याची प्रतिमा मालिन करण्याचा ठपका ठेवत अखेर पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना ऑनलाइन गेम ड्रीम इलेव्हनमध्ये तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले होते. त्यांच्यावर गैरवर्तणूक केल्याप्रकरणी ठपका ठेवत त्यांचं निलंबन करण्यात आल्याचं पिंपरी- चिंचवड पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना गेल्या आठवड्यामध्ये ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेममध्ये अव्वल क्रमांक आल्याने तब्बल दीड करोड रुपयेांचे बक्षीस लागले होते. त्यांची ही बातमी वाऱ्यासारखी अवघ्या महाराष्ट्रभर पसरली. त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. परंतु, त्यांच्या या आनंदावर लवकरच विरजण पडले.
याप्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्यांची चौकशीचे आदेश दिले होते. ही चौकशी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे या करत होत्या, सोमनाथ झेंडे यांना अनेकदा पोलिस आयुक्त चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.
अखेर त्यांच्यावर परवानगी नसताना त्यांनी ऑनलाइन गेम खेळला, त्याचबरोबर गणवेशात माध्यमांमध्ये मुलाखत दिली, पोलीस खात्याची प्रतिमा मालिन केली असा ठपका ठेवत त्यांचं निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांना विभागीय चौकशीत स्वतःच म्हणणं मांडण्याची मुभा मिळणार आहे.