पुणे – शहरासह जिल्ह्यात सायंकाळनंतर धुवाधार पावसाला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे थोडावेळ पडून पाऊस थांबेल, असे वाटत असताना रात्री उशिरापर्यंत विजांच्या कडकडाटांसह पावसाने शहराला झोडपून काढले. शहरात काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या तर सोसायटी आणि वस्तीभागांतील घरांमध्ये पाणी शिरले. पोलीस, महावितरण, अग्निशमन दलाची अक्षरश: धावपळ उडाली. शहरात रात्री साडेअकरापर्यंत 96 मिमी पावसाची नोंद झाली. तर अवघ्या तीन तासांत 76 मिमी पाऊस कोसळला.
शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले. डेक्कन, बालगंधर्व चौक, नळस्टॉप, सिंहगड रस्ता, कात्रज, हडपसर परिसर यासह उपनगरांमधील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. यामुळे शहरात मुख्यरस्त्यांवर रात्रीची वेळ असतानाही वाहतूक कोंडी झाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव शहरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. पावसाने सायंकाळी दमदार हजेरी लावली. अवघ्या दोन तासांत शहरात सुमारे 20 मिमी पाऊस पडला. पावसाचा जोर रात्री कमी होण्याऐवजी वाढतच गेला. त्यामुळे आंबिल ओढ्यासह शहरातील ओढे-नाले तुडूंब भरून वाहू लागले.
रात्री, आठपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या काही वेळात मध्यवस्तीतील अनेक सोसायट्यांत पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. तसेच, उपनगरातील हॉटेल, सोसायट्यांमध्येही पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पाण्यामुळे काही भागात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
कात्रज भागात 142 मिमी पावसाची नोंद झाली. तर खडकवासला – 108 मिमी, वारजे – 63, कोथरूड – 67 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कात्रजमध्ये मागील 10 वर्षांतील एका दिवसात पडलेल्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील दांडेकर पुलालगतच्या वस्तीमधील नागरिकांना सानेगुरुजी शाळा व मनपा कॉलनी या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.
पुणेकरांसाठी रात्र भयाची…
रात्री कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची अक्षरशः झोप उडाली. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांत कोसळणाऱ्या पावसामुळे पुणेकरांना मागील वर्षीच्या त्या काळ्या रात्रीची आठवण झाली. पावसाच्या भीतीने अनेक पुणेकरांनी रात्र जागवून काढली.
पुन्हा एकदा पुणेकरांसाठी बुधवारची रात्री भयाची ठरली. पाऊस कधी थांबतोय, या आशेने कार्यालये, कंपन्या, व्यवसायानिमित्त बाहेर असलेली मंडळी मध्यरात्रीपर्यंत घरी पोहचू शकले नाहीत. नागरिक आहे त्याच ठिकाणी थांबणे पसंत केले.