पुणे – जिल्ह्यात तब्बल सहा महिन्यांच्या विरामानंतर पुन्हा पक्षी निरीक्षणाची पर्वणी अभ्यासकांसाठी उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पक्ष्यांच्या अधिवास असलेल्या पाणवठ्यांवर पक्षी अभ्यासक, छायाचित्रकार आणि हौशी पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. विशेषत: शनिवारी, रविवारी हे प्रमाण अधिक असते.
जिल्ह्यात लॉकडाऊनपूर्वी पक्षी निरीक्षणासंदर्भात नागरिकांकडून नियमितपणे नोंदी घेतल्या जात असत. मात्र, लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या घराबाहेर पडण्यावर मर्यादा आल्या. त्यामुळे एप्रिल ते ऑगस्ट या काळात अभ्यासकांना पक्षी निरीक्षणाची संधीच मिळाली नाही.
मात्र, ऑगस्टपासून सुरू झालेल्या “मिशन बिगिन अगेन’दरम्यान “अनलॉक’मध्ये नियमांमध्ये शिथिलता मिळाली. त्यामुळे लॉकडाऊन काळात पक्ष्यांवर आणि त्यांच्या अधिवासावर काही परिणाम झाला का? याबाबत अभ्यास करण्यासाठी अनेक पक्षी अभ्यासक घराबाहेर पडून पक्षी निरीक्षण करू लागले आहेत.
अर्थात यावेळी कोविड संदर्भातील सुरक्षेच्या उपायांची अंमलबजावणीदेखील होत आहे. शहर परिसरातील सिंहगड बर्ड व्हॅली, वेताळ टेकडी, पंचवटी हिल, पाषाण तलाव, कवडीपाट, येरवडा येथील मुळा-मुठा नदी किनारा अशा विविध ठिकाणी पक्षी अभ्यासक आणि निरीक्षकांकडून पक्षी निरीक्षण केले जात आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर अनेक नागरिक, अभ्यासक पक्षी निरीक्षणासाठी जात आहेत. याकाळात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होत असते. लवकरच विणीचा हंगामही सुरू होणार असल्याने पक्षी निरीक्षकांसाठी ही मोठी पर्वणी ठरेल.
– उमेश वाघेला, पक्षी निरीक्षक