Dheeraj Sahu – झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू (Dheeraj Sahu) यांच्या घर आणि कंपनीच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने धाड टाकली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात बेहिशेबी संपत्ती जप्त केली आहे. साहू यांच्याशी संबंधित झारखंड, ओडिशामधील ठिकाणांवर धाडी टाकून प्राप्तीकर विभागाने ही मालमत्ता जप्त केली आहे. धीरज साहू आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपवर आयकर छाप्यात आतापर्यंत 300 कोटी रुपये वसूल करण्यात आले असून या रकमेत वाढ होत आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या प्रकरणानंतर भाजपकडून काँग्रेसवर टीका करण्यात आली. यानंतर आता या प्रकरणावर काँग्रेसचे सचिव आणि खासदार जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसचे सचिव आणि खासदार जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्ट करत लिहिले की, “खासदार धीरज साहू यांच्या व्यवसायाशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा काहीही संबंध नाही. या संपत्तीबाबत फक्त साहूच सांगू शकतात. तसेच प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या घर-कार्यालयात सापडलेल्या रोख रकमेबाबत साहू यांनीच सर्व काही स्पष्ट केलं पाहिजे.” काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही याप्रकरणी झारखंड काँग्रेसकडून अहवाल मागवला आहे. या प्रकरणानंतर काँग्रेस पूर्णपणे बॅकफूटवर असल्याचे दिसत आहे. जयराम रमेश यांच्या वक्तव्यानंतर आता काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणातून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे.
सांसद धीरज साहू के बिज़नेस से भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का कोई लेना-देना नहीं है। सिर्फ़ वही बता सकते हैं, और उन्हें यह स्पष्ट करना भी चाहिए, कि कैसे आयकर अधिकारियों द्वारा कथित तौर पर उनके ठिकानों से इतनी बड़ी मात्रा में कैश बरामद किया जा रहा है।
The Indian National Congress is…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) December 9, 2023
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या कारवाईची माहिती समाजमाध्यमांवर जाहीर करत काँग्रेसवर टीका केली. “देशातील नागरिकांनी या नोटांच्या ढिगाऱ्याकडं पाहावं, त्यानंतर त्यांच्या (काँग्रेसच्या) इमानदार नेत्यांची भाषणं ऐकावित, जनतेकडून लुटलेल्या प्रत्येक पैशाचा हिशेब यांना द्यावा लागेल. ही मोदीची गॅरंटी आहे”, अशी एक पोस्ट मोदी यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर केली आहे.
कोण आहेत धीरज साहू ?
धीरज साहू यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, ते काँग्रेसचे नेते आहेत. ते झारखंडमधून राज्यसभेचे खासदार आहेत. धीरज साहू हे व्यापारी आहेत. साहू यांचे बंधू शिवप्रसाद साहू हेही खासदार राहिले आहेत. धीरज यांचे कुटुंब स्वातंत्र्यापासून काँग्रेस पक्षाशी जोडले गेले आहे. धीरज साहू यांनी 1977 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 1978 च्या जेलभरो आंदोलनात ते तुरुंगातही गेले होते. जून 2009 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले.
धीरज सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. 2020 मध्ये धीरज प्रसिद्धीच्या झोतात आले. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या निवडणुकीशी संबंधित याचिका फेटाळली. भाजपचे उमेदवार प्रदीप सोथनालिया यांनी त्यांच्या निवडणुकीला आव्हान दिले होते. 2018 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रदीप सोनथालिया यांनी धीरज साहू यांना राज्यसभेत आव्हान दिले होते.