बारामतीत अहिल्यादेवी यांची जयंती उत्साहात
बारामती – धनगर समाजाला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी भाजप कार्यशील असून मतांचे कर्ज व्याजासहित परत करणार असल्याची ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
बारामती येथे अभीकाका देवकाते मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार राहुल कुल, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळकर, चंद्रराव तावरे, बाळासाहेब गावडे, पृथ्वीराज जाचक, उज्ज्वला हाके, प्रदेश सचिव नवनाथ पडळकर, मच्छिंद्र टिंगरे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, नितीन मदने, राहुल कोळेकर उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 जयंती साजरी होत आहे. अहिल्यादेवी होळकर यांची 300 व्या जयंतीस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थितीत राहतील, यासाठी प्रयत्न करणार आहोत. समाजातील युवकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. रोजगारभिमुख शिक्षण गरजेचे आहे. शेळी, मेंढी महेश महामंडळासाठी दहा हजार कोटींची तरतूद सरकारची आहे. धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हजारो युवकांना याचा लाभ घेता येणार आहे. धनगर व इतर समाजाला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. राम शिंदे व विजय शिवतरे यांनी पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
नामकरणाचा शासकीय कार्यक्रम होणार
बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, असे नामकरण केले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नामकरणाचा शासकीय कार्यक्रम घेण्यात येईल. दोन महिन्यांत बारामतीत हा दिमागदार सोहळा पार पडेल, असे आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.