बीड – परळीतील बहीण-भाऊ एकमेकांचे राजकीय विरोधक राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे नेहमी एकमेकांवर टीका करत असल्याचे समोर येते. यावेळी परळीतील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी नाव न घेता पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘सध्या मी एवढ्या मोठ्या टीकेचा धनी आहे, की दिवसाच्या 24 तासातले 2 तास मला उचक्या लागतात.’ परळी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, आपल्या मातीतल्या माणसाची काळजी लागते. मागच्या पाच वर्षाच्या काळात जो परळी- अंबाजोगाई रस्ता करता आला नाही, तो रस्ता आम्ही अवघ्या दीड वर्षात पूर्ण केला. असं म्हणत धनंजय मुंडेंनी, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव न घेता टोला लगावला आहे.
पुढे बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, मी ध्येय वेडा आहे, मी स्वप्न पाहिलंय की, आपल्या परळीमध्ये उद्योग आले पाहिजेत. असंख्य लोक परळीकडे वाटा वळवतील अशी परळी मला करायचीय. सध्या एवढ्या मोठ्या टीकेचा मी धनी आहे, भुयारी गटाराचे एवढे मोठे काम चालू आहे, मला दिवसाच्या 24 तासामधले 2 तास तरी गुचक्या लागतात, कारण एवढे माझे नाव घेतले जाते. पण दिवसात मला 4 तास जरी उचक्या लागून त्रास झाला तरी मी घाबरत नाही. कारण विकास कामे करतांना थोडा वेळ तर लागणारच, पण परळीचा चेहरा पूर्ण बदलणार आहे. काही जण मला दोन वर्षांच्या कामाचा हिशोब मागताहेत, त्यांना पण मी हिशेब देणारचं आहे. असं म्हणत त्यांनी मुंडे भगिनीवर निशाणा साधला आहे.