अहमदनगर – जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागास आज सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या या अतिदक्षता विभागात साधारण 20 ते 25 जण उपचार घेत होते. या घटनेतील मृत रुग्णांच्या नातलगांनी रुग्णांना वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची महिती समोर येत आहे.
यापैकी विवेक खाटिक यांच्या वडिलांचा देखील आगीत होरपळल्यानं मृत्यू झाला. ते गेल्या १० दिवसांपासून उपचार घेत होते. विवेक यांचे वडील कडूबाळ गंगाधर खाटिक (वय ६५ वर्षे) यांचा आगीत मृत्यू झाला.
विवेक म्हणाला की, ‘आग लागली त्यावेळी आयसीयूमध्ये वडिलांजवळ आई होती. मी बाहेर आलो होतो. आग लागल्याचं समजताच मी रुग्णालयात धाव घेतली. मात्र वडिलांना वाचवू शकलो नाही.
आग लागली त्यावेळी आईला बाहेर काढण्यात आलं. मी धावत आलो. आग जास्त असल्याने आई मला आगीत शिरण्यास नको म्हणत होती. मात्र तरी मी आगीत शिरलो. मात्र फार उशीर झाला होता, अशी हृदय पिळवटून टाकणारी माहिती विवेकने दिली.