मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यामध्ये एकाच खळबळ उडाली आहे. या आरोपांनंतर राजकीय घडामोडीना वेग आला असतानाच आता मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील थेट शरद पवारांची भेट घेतलीये.
शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांचीभेट घेत चर्चा केली.
दरम्यान, धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप लगावण्यात आल्यानंतर विश्वास नांगरे-पाटील थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
विश्वास नांगरे-पाटील हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचीत आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीचं कोणतंही कठीण प्रकरण सोडवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे विश्वास नांगरे या प्रकरणाची गुंतागुंत कशी सोडवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट दिल्यानंतर आता विश्वास नांगरे पाटील थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत. पवारांच्या भेटीनंतर विश्वास नांगरे पाटील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. विश्वास नांगरे पाटील सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, धनंजय मुंडेंवरच्या बलात्काराच्या आरोपांनंतर या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झालंय.