नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविणारे आणि आता शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपच्या समीप पोहोचलेले माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील एका टॅटूमुळे चर्चेत आले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा टॅटू काढल्यानंतर नरेंद्र पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याशी पाटील यांचे मैत्रीचे संबंध असल्याचे त्यांनी वारंवार बोलून दाखवले आहे. नुकतेच त्यांनी आपल्या हातावर देवेंद्र हे नावच गोंदून घेतलं आहे. त्यामुळे, त्यांचे देवेंद्र फडणवीसांवरील प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
या संदर्भात पाटील यांना विचारल्यानंतर ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे डायनामिक नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात माथाडी कामगारांची अनेक कामे केलीत. खरतर त्यांच नाव मी हृदयावर कोरणार होतो. पण किती त्रास होतो, हे पाहून पुढच ठरवू असंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान आपल्या हातावरचा टॅटू पाहून फडणवीस आपल्याला रागावले. मात्र मी त्यांना म्हटलो की, साहेब मी तुमचा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांचे हट्ट पुरवावेच लागतात.
नरेंद्र पाटील यांच्या टॅटूच्या कृतीवरून सोशल मीडियावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये अनेकजण पाटील यांनी चूक केल्याचं म्हणत आहेत. तर काहीजण त्यांचं समर्थन करत आहेत.