पंढरपूर – घरात रुग्ण असेल आणि त्याला दुर्धर आजाराने घेरले तर आपण नेहमीच देवाचा धावा करतो. अनेकदा नवसही केले जातात. अनेक रुग्ण मृत्यूच्या दाढेत परत येतात. त्यानंतर रुग्णाचे नातेवाईक देवाला केलेला नवस पूर्ण करतात. मात्र पंढरपूरमधून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली असून पत्नीने पतीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी पंढरीच्या श्री विठ्ठल मंदिराला १ कोटी रुपयांची देणगी अर्पण केली आहे.
नवऱ्याच्या शेवटच्या इच्छेखातर पत्नीने एक कोटी रुपयांची रोख रक्कम श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केली. सदर महिला भक्त ही मुंबई मध्ये राहते. नुकतेच तिच्या पतीचे करोना निधन झाले आहे. मृत्यूपूर्वी महिलेच्या पतीने श्री विठ्ठलाच्या मंदिराला देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या इच्छेची पूर्तता महिलेने केली आहे.
वास्तविक पाहता हे कुटुंब मध्यमवर्गीय आहे. या कुटुंबासाठी एक कोटी रक्कम खूप मोठी आहे. मात्र पतीच्या शेवटच्या इच्छेसाठी विम्यापोटी मिळालेल्या रक्कमेपैकी एक कोटी रुपये महिलेने श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले आहेत.
मुंबईस्थित या कुटुंबातील महिलेचा पती एका खासगी कंपनीत नोकरीला होता. त्यांना एक छोटं बाळही आहे. या कुटुंबाची विठ्ठलावर अपार श्रद्धा होती. त्यामुळे ते नेहमीच पंढरपूरला जात होते. मात्र काही दिवसांपूर्वीच विठ्ठल भक्त असलेल्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाला करोनाची बाधा झाली. यातच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान आपण वाचणार नाही, असं वाटल्यानंतर त्यांनी आपली शेवटची इच्छा पत्नीकडे बोलून दाखवली. यानुसार विम्याच्या रकमेतून एक कोटी रुपये विठ्ठल मंदिराला देणगी देण्याचा शब्द त्यांनी पत्नीकडून घेतला. पत्नीने पतीला दिलेले शब्द आता पूर्ण केला.
एक कोटी रुपये श्री विठ्ठल मंदिराला देणगी देऊन पत्नीने पतीची शेवटची इच्छा पूर्ण केली. जाताना त्या मायमाऊलीने मंदिर समिती व्यवस्थापनाला विनंती केली की, मी सामान्य कुटुंबातील असून मी एवढी मोठी रक्कम देणगी दिल्याचे पाहून लोकं मला त्रास देतील. त्यामुळे माझे नाव गुपित ठेवा.